औरंगाबाद : भरधाव कंटेनर ट्रकचे टायर फुटून झालेल्या विचित्र अपघातात १६ लोक गंभीर जखमी आणि १ ट्रॅक्टर, २ अॅपे रिक्षा, २ छोटा हत्ती, २ मोटारसायकल अशा ७ वाहनांचा चुराडा झाला. औरंगाबाद-जालना रोडवर करमाड गावाजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला. अपघात होताच कंटेनरचालक घटनास्थळाहून पसार झाला.
कंटेनर ट्रक (क्र. एम. एच.४३ वाय २२६५) हे अवजड यंत्रसामग्री घेऊन औरंगाबादकडून जालनाकडे जात होते. कंटेनरसमोर ट्रॅक्टर (क्र. एम. एच २० सी. टी. ९९०५) हे खत घेऊन चालले होते. अचानक कंटेनरचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व कंटेनर ट्रॅक्टरवर जाऊन आदळले. भरधाव कंटेनरने ट्रॅक्टरला तसेच जवळपास शंभर फूट फरपट नेले. रस्त्याच्या कडेला चिंचेच्या झाडावर दोन्हीही वाहने जाऊन अडकली. सोमवारी करमाडचा आठवडी बाजार होता. त्यामुळे कापूस खरेदी करणार्या व्यापार्यांनी जालना मार्गावर दुकाने थाटली होती. तसेच चिंचेच्या झाडाखाली टरबूज व रसवंतीचे दुकान होते. या दुकानासमोर टोणगाव, आपतगाव, पिंप्रीराजा व लाडसावंगी येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी आलेले होते, तर काही लोक टरबूज घेत होते. बेसावध असलेल्या या ग्रामस्थांवर अचानक कंटेनर व ट्रॅक्टर येऊन धडकले.
जखमींची नावे अशी: सचिन राजू खरात (३५), संदीप पांडुरंग व्यवहारे (२५, रा. पिंप्रीराजा ता. औरंगाबाद), मधुकर बंडू रणभरे (६५), नामदेव रणभरे (६०), काकासाहेब बाबूराव जाधव (५०), ज्ञानेश्वर पद्माकर सरोदे (२६), कुंडलिक विश्वनाथ आहेर (७०), सतीश पुंडलिक आहेर (३०), तुकाराम मनाजी सरोदे (५५, सर्व रा. टोणगाव ता. औरंगाबाद), भाऊसाहेब बाबूराव सोळुंके (६३), दत्ता भाऊसाहेब सोळुंके (२४,रा. गोलटगाव ता. औरंगाबाद), बागवान रहिबर ताहेर (१६), जाकीर शब्बीर अहमद बागवान (३५), शब्बीर शफी अहमद बागवान (३०), सलीम रशीद शेख (२३, सर्व रा. लाडसावंगी ता. औरंगाबाद), ज्ञानेश्वर गंगाधर डांगे (३५,रा. भालगाव,ता. औरंगाबाद), दिगंबर शंकर हजारे (३०), मधुकर देवराव हजारे (रा.आपतगाव ता. औरंगाबाद).
अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरदचंद्र रोडगे, रमेश धस, सुशीलकुमार बागुल, रवींद्र साळवे, अशोक वाघ, आदिनाथ उकर्डे, परमेश्वर आडे, ज्ञानेश्वर बेले यांच्यासह ग्रामस्थ, उपसरपंच दत्तात्रय उकर्डे, कैलास उकर्डे, कृष्णा उकर्डे, सचिन कर्नावट, बळीराम राऊत, परवेज सय्यद, अनिस सय्यद, गणेश मुळे, नासेर पठाण, दत्तात्रय सोनवणे, रमेश आघाडे, योगेश आघाडे, कृष्णा जाधव, संजय काकडे यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादला पाठविले. जखमींवर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालय व खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत. या अपघातात छोटा हत्ती (एम. एच.२०सी टी९९०५), मिनिडोअर (एम. एच.२०सी पी९५), अॅपेरिक्षा (एम. एच. २० डी ई ६३६०), मोटारसायकल (क्र. एम. एच. २० आर. १३२४) या वाहनांचा चुराडा झाला. या अॅपे व छोटा हत्ती वाहनांद्वारे शेतकर्यांनी कापूस विक्री करण्याकरिता आणला होता. फसलेली वाहने क्रेनच्या साहाय्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने वेगळी केली. तसेच वाहतूक रस्त्याच्या दुसर्या बाजूला वळविली.
रस्त्यावरील बाजार अपघाताला निमंत्रणकरमाडचा आठवडी बाजार हा जवळपास ३०-३५ गावांसाठी असून, सोमवारी बाजाराला यात्रेचे स्वरूप येते. बाजार औरंगाबाद-जालना मार्गालगत भरत असल्याने नेहमी वाहतुकीची कोंडी होते. त्यातच व्यापारी आपली दुकाने भर रस्त्यावर मांडत असल्याने येथे नेहमी किरकोळ अपघात होतात. सहा वर्षांपूर्वी जयपूर येथील दोन महिला बाजार करण्यासाठी आल्या असता त्यांना ट्रकने चिरडल्याने त्या जागीच ठार झाल्या होत्या.
जखमींवर धूत हॉस्पिटल, घाटीत उपचार करमाड येथील भीषण अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना धूत हॉस्पिटलमध्ये, तर पाच जणांना घाटीत दाखल करण्यात आले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर प्रभू सरवदे (२६), ज्ञानेश्वर विठ्ठल डांगे(४०), सतीश पुंडलिक अहिरे (३५), कुंडलिक विश्वनाथ आहेर (७०), दिगंबर शंकरराव हजारे (६५), रायबर बागवान (१३)हे धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी सतीश, मधुकर आणि दिगंबर हे आयसीयूमध्ये दाखल असल्याची माहिती अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांनी दिली, तर घाटी रुग्णालयात काकासाहेब जाधव (६०), नामदेव रंगभरे (६८),मधू रंगभरे (६५), सचिन खरात (२५) आणि सुनील विठ्ठलराव डांगे (२५) हे उपचार घेत आहेत. सर्व जखमींना शासकीय सेवेच्या १०८ अॅम्ब्युलन्सने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांना तातडीने उपचार मिळाले.
हरिभाऊ बागडे यांच्याकडून रुग्णांची विचारपूसराज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली. शिवाय त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉॅ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. अश्फाक उपस्थित होते.
मदतकार्यासाठी अनेकजण धावलेकंटेनर थेट सरळ अजिनाथ म्हस्के यांच्या रसवंतीत शिरल्याने रसवंती पूर्णपणे नष्ट झाली. अपघात झाल्याची माहिती कळताच याठिकाणी मदत कार्यासाठी अनेक जण धावले. अनेक नागरिकांनी हातात पहार घेऊन वाहनांचा पत्रा बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मदत कार्यासाठी पंचायत समिती सदस्य रामकिसन भोसले, करमाडचे उपसरपंच दत्ता उकर्डे, अर्जुन उकर्डे, राधाकिसन इत्थर, सजन बागल, कृष्णा बागल, शिवाजी बागल, अप्पासाहेब मते, काकासाहेब चौधरी, आबासाहेब मते, शाम मते, कल्याण पोफळे, रवी थोरे, करमाडचे नागरिक, व्यापारी, शिवाय टोणगाव, जडगाव, हिवरा, जयपूर, गारखेडा, लाडगाव यांच्यासह परिसरातील अनेक गावांचे नागरिक मदतीसाठी उतरले.
सायरन वाजताच घाटी सज्जकरमाड येथे झालेल्या अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी दोन वेळा सायरन वाजला आणि घाटी रुग्णालय सज्ज झाले. सायरनच्या आवाजाने डॉक्टर, समाजसेवकांनी अपघात विभागाकडे धाव घेतली. घाटीतील अपघात विभागात सायरन बसविण्यात आलेला आहे. जखमींची संख्या अधिक असल्यास हा सायरन वाजविण्यात येतो. अनेक दिवसांनंतर सोमवारी हा सायरन वाजला. घटनेची माहिती मिळताच अपघात विभागासमोर स्ट्रेचर सज्ज ठेवण्यात आले होते. दाखल झालेल्या पाच जखमींना तात्काळ दाखल करून घेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्यासह इतर डॉक्टरांनी अपघात विभागात धाव घेतली.