निवडणूक आयोगाच्या निर्देशाने शहर आणि ग्रामीणमधील सुमारे १३०० शस्त्रे केली पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:16 PM2019-04-04T23:16:43+5:302019-04-04T23:17:35+5:30
लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली.
औरंगाबाद : लोकसभा निवडणूक शांत व सुरक्षित वातावरणात व्हावी, याकरिता शहर पोलिसांच्या निर्देशानुसार ८०० शस्त्रपरवानाधारकांनी तर ग्रामीणमधील ४९९ व्यक्तींनी त्यांची शस्त्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा केली. शस्त्रे जमा करण्यासंबंधी पोलिसांकडून नोटिसा प्राप्त झाल्यानंतर शहरातील बँका, सुवर्णपेढ्यासह जीविताला धोका असलेल्या व्यक्ती अशा सुमारे १५० जणांना शस्त्रे त्यांच्याकडे ठेवण्यास मुभा दिली. जे नागरिक नोटीस मिळाल्यानंतरही शस्त्रे जमा करणार नाहीत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत १ हजार ३०५ जणांना पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ८८ नागरिक, व्यापारी प्रतिष्ठाने यांनी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अथवा बंदूक आदी प्रकारची अग्निशस्त्रे खरेदी केली आहेत. याबाबतची नोंद त्यांच्या शस्त्र परवान्यावर आहे. लोकसभा निवडणूक निर्भीड वातावरणात व्हावी, याकरिता प्रत्येक निवडणूक काळात परवानाधारकांकडून त्यांची शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यानुसार शहरातील १ हजार ३०५ परवानाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यापैकी ८०० नागरिकांनी स्वत:हून पोलीस ठाण्यात येऊन त्यांची शस्त्रे जमा केली, तर १५० नागरिक, बँका आणि सुवर्णपेढ्याचे मालक यांनी पोलीस आयुक्तांना अर्ज करून त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी शस्त्र त्यांच्याकडेच ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या अर्जावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर चर्चा होऊन संबंधिताला खरेच शस्त्राची गरज आहे का, अथवा त्यांचा राजकीय पक्षाशी काही संबंध आहे, याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यांनतर त्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आली.
चौकट
औरंगाबाद ग्रामीणमधील ४९९ नागरिकांनी केली शस्त्रे जमा
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील ५०८ जणांना शस्त्र परवाना दिले आहे. या परवान्यावर शस्त्र खरेदी केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून शस्त्र जमा करण्यासंबंधी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी ४९९ जणांनी आज गुरुवारपर्यंत त्यांची शस्त्रे पोलीस दरबारी जमा केली.
गुन्हा दाखल होऊ शकतो
पोलिसांच्या नोटिसीनंतर शस्त्रे जमा न करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाऊ शकते. मात्र, ज्या लोकांनी रीतसर अर्ज केल्यानंतर समितीच्या आदेशानंतर ज्यांना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्यास परवानगी मिळाली, त्यांना कारवाईतून वगळले जाणार आहे.