औरंगाबाद : दौलताबाद परिसरातील करोडी शिवारात ६० वर्षांच्या वृद्धेच्या खुनाचा उलगडा झाला आहे. खून करणाऱ्या सचिन मंचक नरवाडे (वय २४) यास गुन्हे शाखा आणि दौलताबाद पोलिसांच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील गुंडा गावातून बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. खाटचोरीचा जाब विचारल्यामुळे त्याने वृद्धेचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, बार्डाबाई नरवडे या करोडी शिवारात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा पंडित नरवडे हा ऊसतोडीच्या कामाला बाहेर गेलेला आहे. १४ डिसेंबर रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर बार्डाबाई तेथेच थांबल्या. त्यांच्या घरातील फायबरची खाट परिसरातच राहणाऱ्या सचिन नरवडे याने चोरली होती. खाटेच्या दोऱ्या त्याने घरात आणून टाकल्या होत्या, अन्य साहित्य त्याच्याकडेच ठेवले होते. हा प्रकार बार्डाबाई यांना समजल्यावर त्यांनी सचिनला झापले होते. त्या इतरांना सांगून पोलिसांत तक्रार देतील, ही भीती वाटल्याने सचिनने १५ डिसेंबरच्या रात्रीच बार्डाबाई यांचा खून केला. सचिन फरार होता. त्यास पकडण्यासाठी निरीक्षक राजश्री आडे आणि गुन्हे शाखा प्रयत्न करीत होत्या.
नातेवाइकांकडे सापडला आरोपीसचिन हा मूळचा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रहिवासी आहे. त्याचा आतेभाऊ परभणी जिल्ह्यातील गुंडा गाव येथे राहतो. सचिन त्याच्याकडेच लपला होता. ही माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाल्यानंतर, उपनिरीक्षक म्हस्के, सहायक फौजदार सतीश जाधव, अंमलदार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकूर, रवींद्र खरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे, नितीन देशमुख आणि गायकवाड यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे करीत आहेत.