पिंपरी चिंचवडमध्ये एकावर फायरिंग करणारा आरोपी औरंगाबादेत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 03:23 PM2021-01-16T15:23:02+5:302021-01-16T15:24:09+5:30
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
औरंगाबाद : पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथे ९ जानेवारी रोजी इंग्रजी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकावर गोळी झाडून आरोपी फरार झाला होता. या आरोपीला औरंगाबाद पोलिसांनी महावीर चौक परिसरात शुक्रवारी ( दि. १५ ) रात्री अटक केली.
सुनील भगवान हिवळे (२८, रा. श्रीकृष्ण नगर,हडको) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार आनंद सोळुंके (रा. सांगवी, पिंपरी चिंचवड) हे ९ जानेवारी रोजी रात्री पत्नी आणि शेजारच्या मुलीसह वॉकिंग करीत होते. यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपी सुनीलने जुन्या वादातून त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत ते बालंबाल बचावले. या घटनेनंतर आरोपी तिथून पळून गेला होता. याप्रकरणी सोळुंके यांच्या तक्रारीवरुन सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, शुक्रवारी रात्री आरोपी सुनील शहरात फिरत असल्याची माहिती खबर्याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, शेख हबीब,शिवाजी कचरे, अनिल थोरे यांनी क्रांतीचौक ठाण्याचे गस्तीवरील सहाय्यक सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्यासह आरोपीचा शोध घेतला. यावेळी तो महावीर चौक परिसरात पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादवि कलम ३०७ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून कारवाईची माहिती सांगवी पोलिसांना कळविली.