औरंगाबाद : पैशाच्या वादातून सोमीनाथ मांगीलाल राठोड यांचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा भावांपैकी राजू मोतीलाल राठोड (३१), विजय मोतीलाल राठोड (३५) या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तर संजय मोतीलाल राठोड (३८, सर्व रा. मारसावळी तांडा, ता. फुलंब्री) याला मारहाण केल्याप्रकरणी एक वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी बुधवारी ठोठाविली.
प्रकरणात मयत सोमीनाथ राठोड यांची पत्नी वैशाली राठोड (३८, रा. मारसावळी तांडा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, सोमीनाथ राठोड यांनी गावातील राजू राठोड याला दहा ते बारा हजार आणि विजय राठोड याला पंधरा हजार रुपये उसनवारी दिले होते. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती घरी असताना तेथे आरोपी राजू आणि विजय राठोड असे दोघे आले. त्यांनी सोमीनाथ यांना आवाज देऊन घराबाहेर बोलावले. त्यावेळी फिर्यादी भांडी घासत होत्या. सोमीनाथ हे घराबाहेर आले असता आरोपी राजूने त्यांच्या पोटावर चाकूने वार केला तर विजयने त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली.
पतीला सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये आल्या असता राजूने त्यांच्यावर देखील चाकूने वार करुन जखमी केले. मारहाण सुरु असतांना आरोपीचे भाऊ संजय राठोड हा तेथे आला व त्याने देखील फिर्यादीला मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या सोमीनाथ राठोड यांना जीपमधून घाटीत आणले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.