वाळूज महानगर : वाळूज परिसरात वाळू चोरीच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यात कासोडा व नांदेडा शिवारातून अवैध वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांसह त्यांना मदत करणा-या जमीन मालकांवर कारवाई करीत २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
वाळूज परिसरातील कासोडा व नांदेडा शिवारातून मोठ्या प्रमाणात माती मिश्रीत वाळूचे उत्खनन करुन चोरीटी विक्री केली जात असल्याच्या तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार डॉ. अरुण जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू माफियाविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली. नांदेडा शिवारात मुरलीधर केदारे हा वाळूची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
मंडळ अधिकारी सतीश भदाणे, तलाठी ए.एम. बनसोड यांनी नांदेडा शिवारात पहाणी केली असता येथील गट नं ७१ मध्ये लक्ष्मण भंगारे, ज्ञानेश्वर भंगारे, गट नंबर १०४ मध्ये राम भंगारे व गट नं. १११ मध्ये बालचंद जाधव यांनी माती मिश्रीत वाळूचे उत्खनन करुन वाळू उपसा केल्याचे तसेच जमिनीवर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याचे दिसले. हाच प्रकार कासोडा शिवारात मंडळ अधिकारी संदीप वाडीकर व तलाठी विजय गिरबोने यांना पाहणीत दिसून आला.
मंडळ अधिकारी भदाणे यांनी लक्ष्मण भांगरे, ज्ञानेश्वर भांगरे, राम भांगरे व बालचंद जाधव (सर्व रा. नांदेडा) यांच्या विरोधात तर मंडळ अधिकारी संदीप वाडीकर यांनी मुक्तार शेख (रा. तुर्काबाद), कैलास दाभाडे (रा.कासोडा) यांच्यासह जमीन मालक प्रकाश वैद्य, शिवाजी हिवाळे, कल्याण हिवाळे, केशरबा हिवाळे, रामनाथ शिनगारे, संगीता हिवाळे, विठ्ठल नवले, नवनाथ नवले, मंजूषा देवबोने, रमेश देवबोने, शशीकला देवबोने, रामनाथ दाभाडे, बाबासाहेब देवबोने, हरिचंद्र सावंत, दिगंबर सावंत, केशव गिरबोने, रामनाथ गिरबोने, साईनाथ गुंडाळे, पुंजाराम गुंडाळे, सोपान नवले (रा. सर्व कासोडा) यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अवैध उत्खनन व चोरटी विक्री करणा-या एकूण २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार बांगर हे करीत आहेत.