औरंगाबाद : मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’ ( Climate Change) चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी २६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, औरंगाबाद म्हणून नाही तर, मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सध्या मराठवाड्यावर वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. ढगफुटी, गारपीट, अवकाळी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ॲक्शन बेस प्लान तयार करावा लागेल. पर्यावरण मैत्रभाव असलेली वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत उर्जेच्या नवीन स्त्रोतावर लक्ष देण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २५० मेगावॅटचा सोलार एनर्जी प्लांट लावण्याचे नियोजन आहे.
पर्यटनस्थळांचा निर्णय दहा दिवसात ; प्राधिकरणाचा विचारपर्यटनस्थळे कधी खुली करणार, यावर ठाकरे म्हणाले, रुग्णांचे आकडे काही दिवसांत खाली आले तर, सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे उतरतील, अशी अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.
येत्या बजेटकडून अपेक्षा२०२० च्या बजेटमध्ये पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोना काळात वैद्यकीय विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.