विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत ५०० कॉपीबहाद्दरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 08:02 PM2018-03-26T20:02:51+5:302018-03-26T20:05:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. या कॉपीबहाद्दरांच्या उत्तरपत्रिका समितीपुढे ठेवून त्यांचा पूर्ण वर्षांचा निकाल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना १७ मार्चपासून सुरुवात झाली आहे. पदवीच्या विविध अभ्यासक्रमांची दोन लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात पहिल्या दिवशी केवळ ३ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले होते. मात्र दुसर्या दिवशी हा आकडा ३० वर पोहचला. यानंतर तिसर्या दिवशी १६३, चौथ्या दिवशी १४७ आणि पाचव्या दिवशी १६१ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. विद्यापीठाने यावर्षी भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी सदरिल कारवाई केली आहे. यापूर्वीही परीक्षांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात येत होती. मात्र कारवाईचा आकडा हा अत्यल्प असे. मात्र मागील वर्षी अभियांत्रिकीच्या परीक्षेत घडलेल्या प्रकारापासून परीक्षा विभागाने कॉपी आणि परीक्षा घेण्याविषयी काही कडक पावले उचलली आहेत. याशिवाय भरारी पथकांमध्ये कडक शिस्तीच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला. यामुळे कॉपीबहाद्दर पकडण्याचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.
परीक्षेला दांडी मारणारांचे मोठे प्रमाण
पदवी परीक्षेला दांडी मारणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही हजारांमध्ये असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. पदवी परीक्षेला १७ मार्च रोजी तब्बल १५ हजार १७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. १९ मार्च रोजी १३ हजार ९२६, २० ला १९ हजार ५७, २१ ला १६ हजार ८२८ आणि २२ मार्चला १६ हजार ५७७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.