अभिनेत्री मयूरी कांगो गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड, औरंगाबादच्या लेकीची गरुडझेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:55 AM2019-04-05T06:55:18+5:302019-04-05T06:56:09+5:30
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी.
औरंगाबाद : औरंगाबादच्या लेकीने जागतिक डिजिटल मीडिया क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. शहरात लहानाची मोठी झालेली व ‘पापा कहते है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री मयूरी कांगोने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला अलविदा केला होता. त्यानंतर डिजिटल मीडिया क्षेत्र पादाक्रांत करीत नुकतेच तिने गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून पदभार स्वीकारला.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी. १२ वीत शिकत असताना सईद मिर्झाच्या ‘नसीम’ या चाकोरीबाहेरच्या चित्रपटाद्वारे तिने चंदेरी दुनियेत पदार्पण केले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘पापा कहते है’ या चित्रपटाने ती प्रसिद्धीझोतात आली. चित्रपटातील ‘घर से निकलते ही..’ या अभिनेता जुगल हंसराजसोबतच्या युगल गीताच्या माध्यमातून तिने तेव्हा अख्ख्या तरुणाईच्या हृदयावर राज्य केले. तेव्हापासून तिची कर्मभूमी मुंबई बनली. त्यानंतर तिने ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जित’, ‘बादल’,‘ जितेंगे हम’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्याच वेळेस टीव्ही चॅनलवरील ‘डॉलर बहू’, ‘थोडासा गम, थोडी खुशी’, ‘दाग’, ‘किटी पार्टी’, ‘घर घर की कहानी’ या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली. दरम्यान, अनिवासी भारतीय अमेरिकेतील उद्योजक आदित्य धिल्लन यांच्यासोबत २१ डिसेंबर २००३ रोजी तिचा औरंगाबादमध्ये थाटात विवाह झाला.
लग्नानंतर तिने न्यू यॉर्कमध्ये
संसार थाटला. तिथे तिने बरूच कॉलेज झिकलिन स्कूल आॅफ बिझनेस येथे एमबीएची पदवी घेतली. याच काळात ती २०११
मध्ये मायदेशी गुडगाव येथे स्थायिक झाली. येथेच तिने प्युबलिसीस या फ्रेंच कंपनीचा भाग असलेल्या परफार्मिक्स या कंपनीसोबत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. याच अनुभवाच्या जोरावर तिला गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेडपदी नियुक्त करण्यात आले आहे.
मी खूप आनंदी आहे...
‘आज मी खूप आनंदी आहे. गुगल-डॅन आणि फ्युबिलिक्स यांच्या भागीदारीत इंडस्ट्री हेड
या पदावर काम करीत आहे. ही खूप
मोठी संधी माझ्यासाठी आहे. व्यावसायिकदृष्ट्या भविष्यामध्ये मला यामुळे खूप फायदा होईल,’ असे मयूरीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.