'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 12:38 PM2022-01-28T12:38:10+5:302022-01-28T12:39:05+5:30
आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे
औरंगाबाद : खामनदीचे पुनरुज्जीवन केल्यावर विविध उपक्रमांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. या ठिकाणी सरोवर, उद्यान, लॉन आणि ऑक्सिजन हबला शिवसेना मंत्री, आमदार, नेत्यांची नावे देण्यात आल्याने भाजपने यावर सडकून टीका केली आहे. शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय, असा सवाल करीत भाजपने या प्रकाराबाबत केंद्र शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
आदित्य सरोवर, चंद्रकांत योग लॉन, अंबादास फुलपाखरू उद्यान, सुभाष ऑक्सिजन हब अशी काही नावे खामनदी परिसरातील उपक्रमांना देण्यात आली आहेत. यावरून आता शिवसेनेसह पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, इको सत्त्व, छावणी नगर परिषद, व्हेरॉक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत खामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली आहेत. हे सगळे उपक्रम शिवसेना नेत्यांच्या योगदानातून राबविलेले आहेत काय, असा सवाल भाजपने केला आहे.
जनतेच्या पैशातून खूश करण्याचा प्रकार
खामनदीचे पुनरुज्जीवन केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून झाले आहे. स्मार्ट सिटीला केंद्राचा निधी आहे. त्या निधीचा दुरुपयोग होत असेल तर आम्ही विरोध करणार. प्रशासनाने जनतेच्या पैशातून वैयक्तिक कुणाला खूश करण्यासाठी असे प्रयत्न करणे योग्य नाही. या सगळ्या प्रकरणाची केंद्र शासनाकडे लेखी तक्रार तर करूच, शिवाय अधिवेशनातदेखील हा मुद्दा उचलून धरू, असा इशारा आ.अतुल सावे यांनी दिला.
या कामासाठी सगळ्यांचे योगदान
खामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पांत शिवसेना मंत्री, नेते, लोकप्रतिनिधींची नावे देण्याची गरज काय आहे? शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर असल्याप्रमाणे हा प्रकार आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगर परिषद या संस्थांचे यात याेगदान आहे. शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेचा हातभार आहे. त्यामुळे अशी नावे देताना प्रशासकीय यंत्रणेनेदेखील विश्वासात घेणे गरजेचे होते. या सगळ्या हुजरेगिरीवर भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला.