वाळूज महानगर : एकीकडे राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सरकारच्या निर्णयाला बगल देत खुलेआमपणे उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण वाढीला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र वाळूज महानगरात पहावयास मिळत आहे.
वाळूज महानगरातील बजाजनगर, पंढरपूरसह परिसरातील स्थानिक प्रशासनाकडून नागरिक वसाहतीतून जमा झालेल्या प्लास्टिकसह इतर कचऱ्याची याच भागातील मोकळ्या जागेवर जाळून विल्हेवाट लावली जात आहे. प्रशासनाकडे कचरा संकलनाची पुरेशी व्यवस्था नाही. शिवाय कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा डेपोही नाही. त्यामुळे कर्मचारी जमा झालेला कचरा जागा मिळेल तिथे आणून जाळत आहेत. बजाजनगर नागरी वसाहतीत असलेली खदाण, साजापूर पोलीस कॉलनी, एमआयडीसी एसटीपी प्लॅन्ट, रांजणगाव पाझर तलाव, व पंढरपूर फुलेनगरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत.
प्रशासनाचे पाहून व्यवसायिक व नागरिकांडूनही कचरा मोकळ्या जागेवर आनुन खुलेआमपणे जाळला जात आहे. वाढते प्रदूषण व धुरामुळे नागरिकांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत असल्याने पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संबंधी स्थानिक ग्रामपंचायतीला नोटिसा दिल्या आहेत. उघड्यावर कचरा न जाळता त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. पाहणी करुन याविषयी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नागरिक व वाहनधारक त्रस्तस्थानिक प्रशासनाकडून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उघड्यावर कचरा जाळला जात आहे. धुरामुळे पादचारी व वाहनधारकांना दम भरणे, डोळे जळजळ होणे आदी त्रास सहन करावा लागत आहे. बºयाचदा धुरामुळे समोरचे दिसून येत नसल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. शिवाय आग लागून एखादी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेहमीच्याच या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.