कारागृहातील मारहाणीत मृत्यू झालेल्या योगेशचा मृतदेह ३६ तासानंतरही घाटीतील शवागृहात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 07:26 PM2019-01-21T19:26:27+5:302019-01-21T19:32:34+5:30
शवविच्छेदन झाल्यानंतर योगेशचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
औरंगाबाद: न्यायालयीन बंदी योगेश राठोड याच्या खुनाचा संशय असलेल्या हर्सूल कारागृहातील संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना बडतर्फ करावे, योगेशच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत द्यावी, योगेशच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, यासह विविध मागण्यासाठी मृताच्या नातेवाईकांसह बंजारा समाजातील लोकांनी आज सलग दुसऱ्या दिवशी (दि. २१) योगेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे योगेशच्या मृत्यूला ३६ तास उलटल्यानंतरही त्याचा मृतदेह घाटी रुग्णालयातील शवागृहात पडून आहे. आंदोलनावर पोलीस अधिकारी कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मयुरपार्क परिसरातील घृष्णेश्वर कॉलनी येथील रहिवासी योगेश रोहिदास राठोड (वय २९) यास वारंवार फिट्सचा त्रास होऊन तो बेशुद्ध पडल्याचे सांगून हर्सूल कारागृहातील रक्षकांनी त्याला १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशचे नातेवाईक त्याला पाहण्यासाठी घाटीत दाखल झाले तेव्हा योगेशच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वळ होते. शिवाय तो कोमात असताना उपचारादरम्यान १९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मरण पावला होता.
यानंतर हर्सूल कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण करून योगेशचा खून केला, त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी करीत योगेशच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात आंदोलन सुरू केले. २० जानेवारी रोजी दुपारी ईन कॅमेरा शवविच्छेदन झाल्यानंतर योगेशचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मृताचा भाऊ सचिन राठोड यांनी दिेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात संशयित आरोपी म्हणून कारागृह अधिक्षक आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने आंदोलन सुरूच ठेवत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घटनेच्या ३६ तासानंतर योगेशचा मृतदेह घाटीतील शवागृहात पडून आहे.