औरंगाबाद : ठाणे येथील अतिरिक्त मनपा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या बदलीस स्थगिती मिळाल्यानंतर आज औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी उदय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. यासोबतच महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सुद्धा त्यांच्याकडे असणार आहे. चौधरी या आधी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.
मंगळवारी प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने हालचाली होत ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी झालेली बदली स्थगित करण्यात आली. तितक्याच वेगाने आज सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत उदय चौधरी (भा.प्र.से) यांची येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून 7 जून 2016 पासून कार्यरत होते.
चौधरी यांचा अल्प परिचय मुळचे जळगाव येथील चौधरी यांची प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीपासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरु झाली. वर्धा, ठाणे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तमप्रकारे कामगिरी बजावली. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द असलेल्या श्चौधरी यांनी बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून सन 2010 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली.
औरंगाबादची होत आहे उपेक्षा मागील तीन-चार वर्षांपासून वर्षभराच्या आतच जिल्हाधिकारी औरंगाबादेतून बदली करून घेत आहेत. येथून बदली करून गेलेले अथवा बदली झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार हे पुण्यात बदलून गेले. विक्रमकुमार हे डीएमआयसीचे एमडी म्हणून पदोन्नतीने मुंबईत गेले. त्यानंतर आलेले वीरेंद्रसिंह हे तीन महिन्यांतच मंत्रालयात रुजू झाले. निधी पांडे यांची राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सीईओपदी वर्णी लागली. त्यानंतर एन.के. राम यांची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली. म्हणजे औरंगाबादेत वर्ष-दीड वर्ष काम करायचे आणि मोठ्या जिल्ह्यांत बदलून जायचे, असा ‘ट्रेंड’ मागील काही वर्षांपासून महसूल प्रशासनात आला आहे. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करण्याच्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन होतच आहे, शिवाय दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व मराठवाड्याची राजधानी असलेला हा जिल्हा दुर्लक्षित होत आहे.