तीन महिन्यांनंतर खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:16 AM2017-12-19T00:16:48+5:302017-12-19T00:16:53+5:30
तीन महिन्यांपूर्वी सुखना नदीपात्रात दुचाकीसह मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची चौघांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वहिनीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून चार जणांनी तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी सुखना नदीपात्रात दुचाकीसह मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची चौघांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वहिनीवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून चार जणांनी तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी चार तरुणांना अटक केली.
नारायण रतन गरंडवाल (२५), समाधान गणेश कालभिले (२३), राजू तुळशीराम पवार (२१) आणि सुनील गणेश घोगरे (२१, सर्व रा.जुना चिकलठाणा बायपास रोड परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर कृष्णा एकनाथ कोरडे (२२, रा. जुना चिकलठाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, मृत आणि आरोपी एकाच एरियामधील रहिवासी आहेत. मृत हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. वहिनीवर कृष्णाची वाईट नजर असल्याचा संशय नारायणच्या भावाला होता. यावरून त्याच्या भावासोबत जुलै महिन्यात भांडणही झाले होते. ही बाब नारायणला माहीत झाल्याने त्याने कृष्णाचा काटा काढण्यासाठी तीन मित्रांच्या मदतीने कट रचला. कटानुसार १५ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास नारायण हा कृष्णाला जेवण करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे दोघांनी एकत्र मद्य प्राशन केल्यानंतर जेवण केले. यानंतर कृष्णाच्या मागे दुचाकीवर बसून ते घरी जात असताना सुखना नदीच्या काठावर लघुशंकेच्या बहाण्याने दुचाकी थांबविली. यावेळी नारायणने अन्य आरोपींना फोन करून बोलावून घेतले. यावेळी नारायणने कृष्णाशी वाद उकरून काढून भांडण सुरू केले. यावेळी कृष्णाने नारायणची कॉलर पकडताच आधीच तेथे लपून बसलेल्या अन्य आरोपींनी धारदार कोयत्याने आणि कुºहाडीने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला. त्यावेळी सुखना नदीला पूर आलेला होता.
यावेळी आरोपींनी कृष्णाला दुचाकीसह नदीत ढकलून दिले. यानंतर ते तेथून पसार झाले. दुसºया दिवशी कृष्णाचे प्रेत आणि दुचाकी नदीपात्रात आढळली होती. याप्रकरणी एमआयडीसी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने कृष्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली होती. दरम्यान याप्रकरणी मृताचा भाऊ संजय याने भावाच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करणारे पत्र गुन्हे शाखा निरीक्षक यांना दीड महिन्यापूर्वी पाठविले होते.
याप्रकरणी पो. नि. शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, नस्सीम पठाण, कर्मचारी समद पठाण, प्रदीप शिंदे, रमेश भालेराव, संदीप बीडकर, भावलाल चव्हाण, रितेश जाधव यांनी आरोपीला पकडले.
मृताच्या भावाचा संशय ठरला खरा
मृत कृष्णा कोरडे याचा भाऊ संजय कोरडे यांनी ३० आॅक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कृष्णाचा मृत्यू नैैसर्गिक नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. घटनेच्या दिवशी आरोपी नारायणने कृष्णाला जेवण करण्यासाठी सोबत नेले होते. दुसºया दिवशी त्याचे प्रेत सापडले. मात्र नारायण कृष्णा कोरडे यांच्या अंत्यविधीला आला नाही आणि त्याच्या घरीही गेला नव्हता. त्याच्याविषयी त्यांनी संशय व्यक्त केला होता.
तांत्रिक पुराव्याची झाली मदत
पोलिसांनी घटनेच्या दिवशी संशयित आणि मृताच्या मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती काढली. शिवाय शवविच्छेदन अहवाल वाचला. तेव्हा मृताच्या डोक्यात गंभीर घाव मारल्याने समोर आले. मृताच्या शरीरावर अन्य वरखडाही नव्हता. कृष्णाची हत्या करून तीन महिने उलटल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत येतील, अशी कोणतीही शंका मनात नसलेला नारायण बिनधास्त वावरत होता. पोलिसांनी संशयावरून नारायणला ताब्यात घेतले तेव्हा तो या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा बनाव करू लागला. पोलिसांनी त्यास विश्वासात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि अन्य तीन मित्रांच्या मदतीने कट रचून कृष्णाची हत्या केल्याचे सांगितले. नंतर अन्य आरोपींना पोलिसांनी उचलले.