वामकुक्षी पडली महागात; भरदुपारी उघड्या घरातून पाच लाखाचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 02:54 PM2021-06-12T14:54:50+5:302021-06-12T14:55:57+5:30
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना तायडे कुटुंब झोपेतून उठताच त्यांना कपाट उघडे दिसले. त्यांनी कपाट पाहिले असता त्यांतील दागिन्यांची बॅगच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
औरंगाबाद : सिडको एन २ येथील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी भरदुपारी पाच लाखाचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची शुक्रवारी घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार सिडको एन २ मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश काेंडू तायडे (६२) यांनी शुक्रवारी दुपारी पत्नी आणि सुनेसह जेवण केले. यानंतर त्यांची सून रूममध्ये जाऊन आराम करीत होती. तर तायडे हे त्यांच्या पत्नीसह समोरच्या खोलीत दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी पडले. यावेळी त्यांच्या घराच्या हॉलचा मुख्य दरवाजा आणि स्वयंपाक खोलीचे दार उघडे होते. ते झोपलेल्या हॉलमध्येच कपाट होते. या कपाटाला त्यांनी लॉक केले नव्हते. हॉलमध्ये असलेल्या तायडे दाम्पत्याला डोळा लागला आणि त्यांचा घात झाला. याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात तनिष्कच्या बॅगेत ठेवलेले ४ लाख ९६ हजार ४२३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची बॅगच चोरट्यांनी पळविली.
दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना तायडे कुटुंब झोपेतून उठताच त्यांना कपाट उघडे दिसले. त्यांनी कपाट पाहिले असता त्यांतील दागिन्यांची बॅगच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांची सून आणि पत्नीला या घटनेचा धक्काच बसला. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे, उपनिरीक्षक अमोल म्हसके आणि गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रमेश तायडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
तायडे यांच्या घरातून दागिन्यांची बॅग चोरून नेणारी संशयित महिला एन २ येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. या कॅमेऱ्याचे फुटेज पाहून पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरू केला. उघड्या घरातून मोबाईल, पैशाचे पाकीट चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या महिलेने ही चोरी केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला.