औरंगाबाद : शासनाने दि. ४ मे २०१६ च्या शासन निर्णयानुसार नवे पर्यटन धोरण जाहीर केले असून, या धोरणांतर्गत राज्याच्या सकल उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा १५ टक्के वाटा तसेच २०२५ पर्यंत पर्यटन क्षेत्रातून १ दशलक्ष रोजगारनिर्मिती असे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या ध्येयपूर्तीसाठी ग्रामीण आणि कृषी पर्यटन या दोन नवसंकल्पना मांडण्यात आल्या असून, राज्य शासनाने २८ सप्टेंबर रोजी कृषी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे.
एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी विजय जाधव यांनी कळविले की, शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे आणि शहरी पर्यटकांना शांत व निसर्गरम्य ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळावा, यासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करून पर्यटन विकास साध्य करणे, कृषी पर्यटन धोरणाच्या माध्यमातून साध्य होणार आहे. तसेच पर्यटनातून ग्रामीण विकास व ग्रामीण विकासातून राज्याचा विकास ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. याद्वारे ग्रामीण भागातील युवकांना तसेच महिलांना गावातच रोजगार मिळू शकतो. या धोरणांतर्गत विविध योजनाचा लाभ घेता येईल.