२ एकर पिकातून साकारला खिर्डीत कृषी महागणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:37 PM2017-09-03T23:37:23+5:302017-09-03T23:37:23+5:30
२ एकर शेतात उभ्या पिकातून महागणपती आकाराला आला आहे. २०० फूट बाय ४०० फूट लांबी रुंदीची कृषी प्रतिमा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : २ एकर शेतात उभ्या पिकातून महागणपती आकाराला आला आहे. २०० फूट बाय ४०० फूट लांबी रुंदीची कृषी प्रतिमा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी होत आहे. प्रतिमा एवढी भव्य आहे की, ती पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळाचे विलास कोरडे व अलका कोरडे या दाम्पत्यांनी खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावात २ एकर शेतात पिकातून भव्य प्रतिमा नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे. यासाठी २५ किलो गहू, १० किलो मका, १० किलो ज्वारी, १० किलो हरभºयाची दोन महिन्यांपूर्वी गणपतीचा आकार देत पेरणी करण्यात आली. आता पीक ३ फुटांपेक्षा अधिक उंच झाल्यावर त्यास महागणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. गणेशाचे डोळे, जानवे व हार तयार करण्यासाठी बेडशिट, घोंगडी, चादर, मल्चिंग पेपर व फुले यांचा वापर करण्यात आला आहे. यंदा खिर्डी परिसरात कमी पाऊस झाला; पण येथील शेततळ्यात मागील वर्षीपासून साठवून ठेवलेल्या पाण्यावरच पीक खुलले. या महागणपतीच्या देखाव्यातून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, ‘शेततळी तयार करा, ‘ सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य ते नियोजन करावे,’ असा संदेश गावकºयांना देण्यात येत आहे. तसेच या मंडळाच्या वतीने खिर्डी ग्रामपंचायतला ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या योजनेसाठी ११ हजार रुपयांची देणगीही देण्यात आली आहे.
देखाव्यासाठी किशोेर हिवर्डे, रमेश हिवर्डे, राजू राठोड, वैभव कोरडे, कैलास खंदारे, चंद्रमणी जायभाये, संजय राठोड, अतुल सावजी, प्रल्हाद गायकवाड, भाऊसाहेब घुगे, सज्जू जहागीरदार, अतिक पठाण, शेख मजहर, राजू दौेड, संतोष गायकवाड, अनिल गावंडे आदींनी परिश्रम घेतले.