पर्यटननगर छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक स्थळांबरोबर वाढतेय कृषी पर्यटन
By संतोष हिरेमठ | Published: May 16, 2024 03:11 PM2024-05-16T15:11:22+5:302024-05-16T15:11:54+5:30
जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७१ कृषी पर्यटन केंद्रे, बैलगाडी, चुलीवरचे जेवण, विटीदांडू अन् बरंच काही...!
छत्रपती संभाजीनगर : बैलगाडी, चुलीवरचे जेवण, नदी, विटीदांडू, झोका अन् ग्रामीण जीवनाचा काहीसा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले कृषी पर्यटन केंद्रांवर वळत आहे. पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक स्थळांबरोबर आता कृषी पर्यटनही वाढत आहे. शहरी भागातील नागरिक या ठिकाणी जाऊन रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेत आहेत.
दरवर्षी १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने सप्टेंबर, २०२० मध्ये महाराष्ट्राचे कृषी पर्यटन धोरण जाहीर केले. विशेष म्हणजे, भारतात कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यातूनच राज्यात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण, शेती, घरगुती पद्धतीचा रुचकर, महाराष्ट्रीयन भोजन, ताजा भाजीपाला, फळे, ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वारी, शेतातील विविध हंगामांतील कामे दाखविण्याची सोय, विटीदांडू, झोका आदी ग्रामीण खेळ खेळण्याची सुविधा, पोवाडा, गाेंधळ, आदिवासी नृत्य आदींची सुविधा असते. कृषी पर्यटनासाठी येणाऱ्यांची वर्षभर गर्दी असते. नोव्हेंबर, डिसेंबर, पावसाळ्यात ही गर्दी अधिक असते.
कृषी पर्यटनाला चालना
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाभ्रमण योजनेच्या माध्यामातून कृषी पर्यटनाला चालना दिली जात आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७१ नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रे असून, आणखी शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.
कृषी पर्यटनाची वाढतेय व्याप्ती
महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची वाटचाल चांगल्या रीतीने सुरू आहे. राज्यात पर्यटन विभागाकडे नोंदणीकृती ६०० पेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्र आहे. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहेत. पर्यटकांच्या येण्याचे प्रमाणही वाढत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या पर्यटन केंद्रावर ५ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे साधन म्हणूनही कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. यंदाच्या जागतिक कृषी पर्यटन दिनाचा मुख्य कार्यक्रम इटलीत होत आहे. त्यात मी सहभागी झालो आहे.
- पांडुरंग तवार, भारतातील कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक