औरंगाबाद: दरोडा सारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीनिशी शहरात आलेल्या अहमदनगरच्या टोळीतील तीन संशयितांना गस्तीवरील जिंसी पोलिसांनी पकडले. यावेळी पोलिसांना पाहून दोन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून कार, लोखंडी टॉमी, दोरी, मिरची पावडर आणि एअर गन जप्त करण्यात आले.
मध्यवर्ती जकात नाका ते टीव्ही सेंटर रस्त्यावरील गुलाब विश्व मंगल कार्यालयाजवळ ही कारवाई झाली. सुनील अंकुश मळेकर (२६, रा. आळंदी फाटा पुणे ), शेख नशीर शेख बशीर (२६, रा. करंजगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि शेख सलीम शेख बाबू (२६, रा. खटकाळी, ता. राहुरी)अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. शेख समीर शेख शब्बीर(२०, रा. खटकाळी) , कारचालक नजीर उर्फ साहिल शमशोद्दीन सय्यद(२२, रा. पोखरी, अहमदनगर) या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
जिंसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नजीर पठाण,पोलीस हवालदार वाघ, डी आर काकडे, हेमंत सुपेकर, शेख उस्मान आणि सुरेश वाघचौरे हे गुरुवारी रात्री गस्तीवर होते. मध्यवर्ती जकातनाका ते टीव्ही सेंटर रस्त्यावरून ते जात असतांना गुलाब विश्व मंगल कार्यालयाशेजारी त्यांना एक कार उभी दिसली. संशयावरून पोलिसांनी कारमधील लोकांना बाहेर येण्यास सांगितले.
दोन आरोपी फरार यावेळी दोन जण कार सोडून सुसाट पळून गेले. कारमधून अन्य आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांचे नाव गाव विचारल्यावर शहरात येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांच्या कारची झडती घेतली असता कार मध्ये टॉमी, मिरची पावडर, दोरी असा दरोडा टाकण्यासाठी वापरला जाणाऱ्या वस्तू आढळून आल्या. दरोडा टाकण्यासाठीच ते शहरात आल्याचा पोलिसांचा संशय पक्का झाल्याने सहायक उपनिरीक्षक पठाण यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला.