औरंगाबाद महापालिका विद्यार्थ्यांना घडविणार विमानाने दिल्लीवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:05 PM2018-10-27T23:05:39+5:302018-10-27T23:06:17+5:30
महापालिकेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीवारी करण्याचा बेत मागील दोन वर्षांपासून आखण्यात येत होता. प्रत्येक वेळी यामध्ये वेगवेगळे विघ्न निर्माण होत होते. अखेर मंगळवार ३० आॅक्टोबर रोजी दहा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात येणार आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीवारी करण्याचा बेत मागील दोन वर्षांपासून आखण्यात येत होता. प्रत्येक वेळी यामध्ये वेगवेगळे विघ्न निर्माण होत होते. अखेर मंगळवार ३० आॅक्टोबर रोजी दहा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळेतील सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे विमानाने नेण्याची घोषणा तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात तयारी करून परीक्षा दिली. स्पर्धेचा निकालही जाहीर झाला. दहा विद्यार्थ्यांना दिल्लीला नेण्याची तयारीही झाली. दरम्यानच्या काळात बकोरिया यांची बदली झाल्याने हा विषय मागे पडला होता. दिल्लीवारीची नुसतीच घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मनपाची सर्वत्र नाचक्की होत होती. गेल्या आठवडाभरापासून हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यानुसार आता ३० आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिल्लीला नेण्याचा निर्णय प्रशासनाने अंतिम केला आहे. मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता १० विद्यार्थ्यांसोबत शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता नळगीरकर यांच्यासह दोन मुख्याध्यापक दिल्लीला रवाना होणार आहेत. सहली दरम्यान विद्यार्थी दिल्ली व परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत. सर्व विद्यार्थी २ नोव्हेंबर रोजी सकाळी विमानाने परत येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जुबैर गुलाब शेख, फातेमा नूर मोहंमद शेख, संतोष काशीनाथ शिंदे, सानम गुलाब शेख, मोनिका बाळू बनगे, रेणुका सुधीर पांंडे, परवेश कमरोद्दीन मोमीन, मयूर सुरेश मोरे, वैष्णवी मुकेश भूल, अजमल इस्माईल शाह यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक संदीप सोनार, रजनी हिवाळे, डॉ.स्मिता नळगीरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.