हवाई दलाच्या विमानांनी चुकला काळजाचा ठोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:28 PM2019-04-11T23:28:38+5:302019-04-11T23:29:14+5:30
हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.
औरंगाबाद : हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.
शहरात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक आकाशातून मोठा आवाज येऊ लागल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. तेव्हा थोड्या थोड्या अंतराने एकापाठोपाठ दोन विमाने अतिशय वेगाने जात असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले. या विमानांनी आकाशात दोन ते तीन घिरट्या मारल्या. विमानांचा आकाशात मोठा आवाज घुमत होता. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली. शहरातील विविध भागांत नागरिक घराबाहेर जमून चर्चा करीत होते. औरंगाबादेत हवाई दलाचे तळ नाही, मग अचानक लढाऊ विमान शहराच्या हद्दीत कसे काय उड्डाण करीत आहेत, काय झाले असावे, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली. अनेक जण उत्सुकतेपोटी एकमेकांना फोन करून विचारणा करीत होते. ही दोन्ही विमाने पुण्यावरून आली होती. ही सुखोई-३० विमान असून, त्यांनी रात्री ८ च्या सुमारास पुण्याकडे उड्डाण केले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
घरांना कंप
गारखेडा, जवाहर कॉलनी आदींसह शहरावरून विमानाचे उड्डाण होत असताना आवाजामुळे घरांना कंप बसल्याचे जाणवले. त्यामुळे तात्काळ घराबाहेर पडलो, असे अनेक नागरिकांनी सांगितले.
नियमित सराव
हवाई दलाने विमानांच्या लँडिंगसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली. नियमित सरावासाठी हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.