औरंगाबाद: कारमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका जणाला सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीकडून देशी दारूचे तब्बल ३० बॉक्स(१४४० बाटल्या) आणि कार जप्त करण्यात आली. ही कारवाई लाडसावंगी ते सेलूद फाटा दरम्यान करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरटी दारू पकडण्यात आल्याने मद्यतस्करामध्ये खळबळ उडाली.
शंभाजी दामू हिवराळे असे अटकेतील मद्य तस्कराचे नाव आहे. याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक के. पी. जाधव यांनी सांगितले की, औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील विविध गावांत चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्यांना आरोपी हा देशी दारू ठोक दरांत विक्री करतो,अशी माहिती खबऱ्याने उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र तो केव्हा दारू आणून देतो, हे समजत नव्हते. त्यामुळे गेले काही दिवस उत्पादन शुल्कचे अधिकारी रात्रंदिवस त्याच्या पाळत ठेवून होते.
९ फेब्रुवारी रोजी सेलूदफाटा ते लाडसावंगी चौका परिसरातील गावांतील मद्य तस्करांना तो दारू विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. त्यानंतर उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.पी. जाधव, कर्मचारी एस.एम.खरात,वाहनचालक भगवान बडक यांनी सेलूद फाटा ते लाडसावंगी दरम्यान सापळा रचला. तेव्हा संशयित कार त्यांना येताना दिसली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत कार अडविली. त्यावेळी कार सोडून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र सतर्क कर्मचाऱ्यांनी आरोपी शंभाजीला पकडले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये देशी दारूचे तब्बल ३० बॉक्स आढळले. हा दारूसाठा आणि कार जप्त करण्यात आली.