औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनीवर पाडापाडीची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे तेथील सदनिकाधारक स्वत:हून संसारोपयोगी साहित्य काढून घेत बाहेर पडू लागले आहेत. शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाने जनहित याचिका फेटाळली. त्यानंतर तेथील सदनिकाधारकांनी स्वत:हून जागा रिक्त करण्यास सुरुवात केली आहे. तसे ३० एप्रिलपर्यंतच जिल्हा प्रशासनाने सदनिका रिक्त करण्यासाठी आवाहन केले होते.
लेबर कॉलनीवासीयांचे पुनर्वसन करावे, नंतरच कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने लावून धरली आहे. वरळीतील बीडीडी चाळीप्रमाणे तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी भाजप करीत आहे. न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. आजवर अनेकदा सदनिकाधारकांना मुदत देण्यात आली आहे. सध्या तेथील इमारती धोकादायक असून पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास जीवित हानी झाल्यास काय करणार, असे जिल्हा प्रशासनाचे मत असून या आठवड्यात पाडापाडीची कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याबाबत पूर्ण तयारी केली आहे.
जलसंपदा मंत्र्यांसमोर फुटला ‘अश्रूंचा बांध’कोणी ४२ वर्षांपासून, तर कोणी ५० वर्षांपासून राहणाऱ्या घरांतून ऐन उतारवयात बेघर होण्याची वेळ ओढावत आहे. कोणीही दिलासा देत नाही. किमान तुम्ही तरी दोन ओळी लिहून द्या, असे म्हणताना रविवारी लेबर काॅलनीवासीयांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर ‘अश्रूंचा बांध’ फुटला.