महायुतीचे जागा वाटप संपले; छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवर शिरसाट म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 02:09 PM2024-04-01T14:09:58+5:302024-04-01T14:10:51+5:30
शिवसेना शिंदे गट यावेळी किती जागा लढणार हे देखील आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले
छत्रपती संभाजीनगर: लोकसभेची छत्रपती संभाजीनगरची जागा निवडून आणणे महायुतीचे ध्येय आहे. येथील उमेदवार हा शिवसैनिक असेल. आम्ही बैठक घेतली असून एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधला आहे. जागे विषयी चर्चा आता संपली आहे. केवळ उमेदवार जाहीर करणे बाकी असल्याची माहिती शिवसेना शिंदेगट प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महायुतीच्या जागा वाटपावर शिरसाट म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी प्रदीर्घ बैठक घेतली असून सर्व जागा निवडून आणायची चर्चा झाली. यानुसार शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार आहेत. तर २ तारखेपासून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणनीती आखली गेली आहे. महायुतीमध्ये तिढा नाही, आम्हाला अंदाज आहे १६ पेक्षा कमी जागा शिवसेनेला मिळणार नाही, असेही शिरसाट म्हणाले.
काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपसोबत संबंध
नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार आहे. एखाद्या मतदारसंघात कमजोर उमेदवार असेल तर जागा बदलता येईल. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपसोबत संबंध आहे.काही छुपा पाठिंबा देत आहेत. लवकर पक्ष प्रवेश होईल असा दावाही शिरसाट यांनी केला. तसेच रोहित पवार हे कुणाचा प्रचार करतात हे कन्फ्युजन आहे. तर संजय राऊत हे पिलेल्या सारखे बोलतात. त्यांना लोकांच्या दारात जाऊन नाचायच असत. मोदींची तुलना करण्याची राऊत यांची लायकी नाही, अशी टीकाही यावेळी शिरसाट यांनी केली.