आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोकमोर्चाकडून राज्यशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न
By बापू सोळुंके | Published: July 28, 2023 02:23 PM2023-07-28T14:23:27+5:302023-07-28T14:25:09+5:30
राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी आणल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शुक्रवारी क्रांती चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अचानक राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी आणल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतली.
मराठा समाजाला 2019 साली राज्य सरकारने दिलेल आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरानंतर रद्द केले. या संदर्भात सर्व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली.ही याचीका ही न्यायालयाने फेटाळली होती. यानंतर पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. तेव्हापासून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी विविध मराठा संघटना आंदोलन करीत आहेत.
आज दुपारी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने क्रांती चौकात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ,राज्य सरकार हाय हाय, राज्य सरकारचा निषेध असो , आदी घोषणा आंदोलन करते देत होते. या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणला.
दरम्यान, आंदोलकांनी अचानक राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी आणून अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येतात. पोलिसांनी आंदोलन कर्त्याच्या हातातील तिरडी हिसकावून घेण्यासाठी झटापट करावी लागली. या आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक रमेश केरे पाटील ,अनिल कुंटे,धनंजय चिरेकर, संतोष कुसेकर, राजेश लांडगे ,नरहरी उबाळे ,अक्षय शिंदे, बाबासाहेब तवर, आणि संजीव मरकड सह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.