औरंगाबाद : निर्भीड पत्रकार तथा स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा यावर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना नुकताच घोषित झाला आहे. दि. २६ ऑक्टोबर रोजी अनंतराव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी छोटेखानी कार्यक्रमात पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली.
अनंत भालेराव यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासूनच अनंत भालेराव प्रतिष्ठानच्यावतीने स्मृती पुरस्कार देण्यात येतो. पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला होता. कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ, विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर, डॉ. सुधीर रसाळ यासारख्या अनेक दिग्गजांना आजवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यंदा हिमरू वस्त्रांवर विणल्या जाणार्या नक्षीकामातील तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना हा पुरस्कार दिला जाईल. ५० हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७८ वर्षांचे अहमद कुरेशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच या क्षेत्रात काम करायला सुरवात केली. हिमरू नक्षीबाबत त्यांना विशेष आकर्षण निर्माण झाले. त्या काळी अतिशय मोजक्याच नक्षींचा वापर हिमरूकामात केल्या जात होता. अहमद कुरेशी यांनी विविध प्रकारच्या नक्षींचे आरेखन करून त्यांचा वापर करण्यासाठी विणकरांना प्रोत्साहन दिले. पारंपरिक शैलीचा गाढ अभ्यास करून त्यांनी अनेक नविन नक्षी तयार केल्या. अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी पहिल्यांदा हिमरूमध्ये विणून ही कलात्मक शैली लोकप्रिय केली.