मदतीची घोषणाच जोरदार; निराधारांना मदत कधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:02 AM2021-05-08T04:02:11+5:302021-05-08T04:02:11+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने राज्यातील निराधारांना १ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने राज्यातील निराधारांना १ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. १५ एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असून, निराधारांच्या खात्यावर अद्याप १ हजार रुपयांची सरसकट मदत आलेली नाही. वृध्द, विधवा, दिव्यांग मदतीअभावी हताश बनले आहेत.
दरम्यान, एप्रिल आणि मार्च महिन्यातील निवृत्तीवेतन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी तहसील पातळीवर वर्ग करण्यात आले आहे. निराधारांना हाच काय तो दिलासा असून, ते वेतन लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, असा दावा निराधार योजना सेलकडून करण्यात आला.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनाथ, दिव्यांग, परित्यक्ता, घटस्फोटित, विधवांसाठी अनुदान दिले जाते. वरील पाच योजनांच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली आहे. नियमित वेतनाची रक्कम आली आहे. लॉकडाऊनमधील मदत देखील लवकरच येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
योजना लाभार्थी...
संजय गांधी निराधार योजना -३३६४२
श्रावणबाळ योजना -५९०३०
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना - ३८८७९
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - ७१४
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना - १६२
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना - १६२
जिल्हा प्रशासनाने विविध योजनांपोटी आलेले निवृत्ती वेतन असे...
श्रावणबाळ योजनेतील अनुसूचित जाती - जमातींसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये, याच योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १५ कोटी ३७ लाख ८६ हजार ३००, तर संजय गांधी निराधार योजना सर्व मिळून १७ कोटी रुपये, दिव्यांग योजनेसाठी ४ लाख रुपये, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेसाठी ४ कोटी ६३ लाख ८८ हजार ४००, तर विधवा निवृत्तीवेतन योजना सुमारे साडेआठ लाख रुपये तहसील कार्यालयांकडे दिले आहेत.
तहसीलदारांची माहिती अशी...
तहसीलदार अनिता भालेराव यांनी सांगितले की, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे अनुदान आले आहे. तालुक्यात ते अनुदान तहसीलदारांकडे वर्ग होऊन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. शासनाकडून यापुढे जे अनुदान प्राप्त होईल, ते ताबडतोब वर्ग करण्यात येईल.
लाभार्थी काय म्हणतात...
वेतन एक-दोन दिवसात जमा होणार असल्याचे समजले आहे. अद्याप काही मिळालेले नाही. शासनाने जाहीर केलेली मदत देखील लवकर मिळण्याची अपेक्षा आहे, असे दिव्यांग योजनेचे लाभार्थी शाहू चित्ते यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
संचिका मंजूर होऊन काही महिने झाले, मात्र अजून मदत मिळालेली नाही. लॉकडाऊन असल्यामुळे हताश होण्यापलीकडे काहीही करता येत नाही. शासनाची मदतही मिळाली नाही, असे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यमाजी भिंगारदेव यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी सांडू गायकवाड यांनी सांगितले की, दोन महिन्यांपासून निवृत्ती वेतन थकलेले आहे. त्यातच लॉकडाऊन आहे. जे नियमित दिले जाते ते वेतन तरी वेळेत मिळावे, अशी अपेक्षा आहे.