मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सन-२०२३ च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा
By बापू सोळुंके | Published: July 8, 2023 08:47 PM2023-07-08T20:47:51+5:302023-07-08T20:48:32+5:30
मसापच्यावतीने जाहीर झालेले हे पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका समारंभात प्रदान केले जाणार
छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२२मध्ये प्रकाशित झालेलया पुस्तकांतून मसापच्यावतीने सन २०२३च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले. रोख तीन हजार रुपये आणि स्मृतीचिन्हं असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहेत. नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कारासाठी भवान महाजन यांच्या 'रस्ता शोधताना'या आत्मपर लेखन असलेल्या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. महाजन यांची 'मैत्र जीवाचे' आणि 'इये गोदायिचे काठी' ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. तीन हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्हं असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राचार्य म.भि. चिटणीस वाड्मय पुरस्कारासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांच्या 'काव्यस्व' या समीक्षाग्रंथाची निवड करण्यात आली. वसेकर हे एक पत्रकार अन लेखक आहेत. कवी, ललीतगद्य लेखक व समीक्षक म्हूणन त्यांना ओळखले जातात. कै. कुसूमताई देशमुख वाड्मय पुरस्कारासाठी अजीम नवाज राही(रा.साखरखेर्डा, जि. बुलडाणा)यांच्या 'तळमळीचा तळ' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. अजीम यांच्या नावावर व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार हे कवितासंग्रह आहेत.
बी.रघुनाथ कथा -कादंबरी पुरस्कार मराठीतील उत्कृष्ट कांदंबरीला देण्यात येतो. सीताराम सावंत(रा. इटकी, ता. सांगोला, जि. सोलापुर) यांच्या 'हरवलेल्या कथेच्या शोधात'या कथा संग्रहाची या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. सावंत यांची भूई, भूई ठाव दे , देशाेधडी, लगीन आणि नामदार या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.
मराठीतील उत्कृष्ट नाटकाला अथवा नाट्यसंमीक्षेला दरवर्षी कुमार देशमुख नाट्य पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी यंदा मुंबईतील विजयकुमार देशमुख यांच्या चल ऐश करले या नाटकाची निवड करण्यात आली आहे. प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील आणि डॉ. यजद्रथ जाधव ,डॉ. ज्ञानदेश राऊत हे सदस्य असलेल्या समितीने ग्रंथ निवडल्याचे त्यांनी सांगितले.
१३ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण समारंभ
मसापच्यावतीने जाहिर झालेले हे पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका समारंभात प्रदान केले जाणार असल्याचे प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा.किरण सगर, डॉ.दादा गोरे, कुंडलिक अतकरे आणि डॉ. कैलास इंगळेउपस्थित होते.