कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश अर्ज भरण्यास २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:21 PM2020-09-11T13:21:34+5:302020-09-11T13:24:59+5:30
२० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार असल्याचे कृषी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
औरंगाबाद/पुणे : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना येत्या २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल. २० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार असल्याचे कृषी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत १० विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. सध्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३८ महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ११, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत ११ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १ हजार ३३५ एवढी आहे.
या महाविद्यालयांमध्ये कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्स्यविज्ञान ,अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, काढणी पश्चात व्यवस्थापन हे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेली शैक्षणिक सामायिक प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येकी विद्याशाखेची स्वतंत्र सामायिक परीक्षा घेण्यात आली. सामायिक प्रवेश परीक्षेचे ७० टक्के गुण आणि पदवीचे ३० टक्के गुण विचारात घेऊन प्रवेश दिले जाणार आहेत.
असे राहील चारही कृषी विद्यापीठांचे ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक
प्रवेश प्रक्रिया सुरुवात : १० सप्टेंबर
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : २४ सप्टेंबर
तक्रार नोंदणीचा कालावधी : २५ ते २८ सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे: ३० सप्टेंबर
पहिल्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: ५ ऑक्टोबर
पहिल्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी :६ ते ८ ऑक्टोबर
दुसऱ्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: १० ऑक्टोबर
दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : १२ते १४ ऑक्टोबर
तिसऱ्या फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी: १७ ऑक्टोबर
तिसऱ्या फेरीतील प्रवेशाचा कालावधी : १९ ते २१ ऑक्टोबर
रिक्त जागांच्या यादीची प्रसिद्धी करणे : २३ ऑक्टोबर
चौथी प्रवेश फेरी राबविणे : २६ ते २७ ऑक्टोबर
वर्ग सुरू करण्याचा दिनांक : २० ऑक्टोबर
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार असून प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी www.maha-agriadmission.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.