गुन्हेगार निडर झाले ! भररस्त्यात छेड काढून आरोपीने मुलीच्या वडिलांवर उगारला चाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 PM2021-03-04T16:42:02+5:302021-03-04T16:47:12+5:30
The accused attacks on the girl's father छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पीडितेचे मामा आणि वडील धावले असता आरोपीने त्यांच्यावर चाकू उगारला
औरंगाबाद : कोचिंग क्लासला जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पीडितेचे मामा आणि वडील धावले असता आरोपीने त्यांच्यावर चाकू उगारल्याची खळबजनक घटना २ मार्च रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील गजानननगरात घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ऋषिकेश पालोदकर (रा. पुंडलिकनगर), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पालोदकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. तो अल्पवयीन असल्यापासून चोरी, घरफोडींचे गुन्हे करतो. पीडित मुलगी दहावीत शिकते. ती मैत्रिणीसोबत परिसरातील एका कोचिंग क्लासला जाते. १५ दिवसांपासून आरोपी रस्त्यात उभा राहून त्यांच्याकडे रोखून पाहत होता. मात्र, मुलींनी त्याकडे दुर्लक्ष केले. १ मार्च रोजी त्याने तिला आणि तिच्या मैत्रिणीला गाठून, ‘तू छत्री का वापरत नाही, रंग काळा पडेल ना’, असे म्हणून छेड काढली. ही बाब पीडितेने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार करू, असे सांगितले. कामावरून यायला उशीर झाल्याने त्यांना पोलीस ठाण्यात जाता आले नाही.
दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी रात्री ७ वाजता पीडिता मैत्रिणीसोबत शिकवणी वर्गातून घरी जात असताना आरोपीने तिला पाहून शिटी मारली. घाबरलेल्या मुली घाईत घरी जाऊ लागताच ऋषिकेशने तिला अडवून तिचा हात पकडून तिचे नाव विचारले. तिने आरडाओरड करताच आरोपी त्याच्या साथीदारासह हिंदुराष्ट्र चौकाकडे पळून गेला. तिच्या घराजवळच ही घटना घडल्याने तिचे वडील आणि मामा आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाले असता साथीदाराने ऋषिकेशला चाकू दिला. हा चाकू मारण्यासाठी त्याने पीडितेच्या वडिलांवर उगारताच ते मागे वळले. यानंतर आरोपी पसार झाले.
पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा
या घटनेनंतर पीडितेसह तिच्या वडिलांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.