आणखी२०० कर्मचारी जाणार घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:45 AM2018-06-20T00:45:30+5:302018-06-20T00:45:48+5:30
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे. पहिल्या टप्प्यात १८७ कर्मचारी कमी करण्यात आले. आता सहा विभागांमधील जवळपास २०० कर्मचारी कमी करण्यात येणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी या सर्व विभागांचा आढावा घेऊन अहवाल द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेत छोट्या-मोठ्या कामांसाठी आऊटसोर्सिंग, प्रकल्प सल्लागार समिती धूमधडाक्यात नेमल्या जात होत्या. यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू होती. गरज नसताना राजकीय दबावापोटी कर्मचारी भरती करण्यात आली. राजकीय मंडळींनीही आपल्या नातेवाईकांना आऊटसोर्सिंगच्या भरतीमध्ये ‘सेट’ केले. ११०० कर्मचा-यांच्या पगारापोटी दरमहा १ कोटी ६५ लाख रुपये खर्च होत आहेत, तरीही कर्मचा-यांकडून पाहिजे तसे काम होत नाही. त्यामुळे अनावश्यक कर्मचा-यांना कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मागील आठवड्यात १८७ कर्मचारी कमी करण्यात आले. आता सहा विभागप्रमुखांना अतिरिक्त कर्मचा-यांची यादी देण्याचे निर्देश दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सहा विभागांचा बारकाईने आढावा घेऊन अहवाल द्यावा, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे. कारवाईमुळे आऊटसोर्सिंगच्या कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. अतिरिक्त कर्मचारी म्हणून आपले नाव यादीत येऊ नये म्हणून राजकीय पाठबळ मिळविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू झाला
आहे.
आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवून
महापालिकेला सध्या किती कर्मचा-यांची गरज आहे, यादृष्टीने आकृतिबंध तयार केला आहे. भविष्यात किती कर्मचारी लागतील, याचाही विचार आकृतिबंधामध्ये केला आहे. आऊटसोर्सिंगचे कर्मचारी कमी करताना आयुक्त आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवत आहेत. आवश्यक आणि कर्मचारी कामात निपुण आहेत किंवा नाही, याची माहिती घेऊन त्यांना कामावर ठेवण्यात येणार
आहे.