उत्तरपत्रिका लिहावी नेटकी...जाणून घ्या सोपे नियम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:43 PM2020-03-04T17:43:38+5:302020-03-04T17:51:25+5:30
तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले उत्तरपत्रिका लिहिण्याचे सोपे नियम
औरंगाबाद : बारावीच्या परीक्षा आता संपत आल्या असून, या आठवड्यातच शालांत परीक्षांची सुरुवात होत आहे. बारावीच्या मुलांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो; पण दहावीचे विद्यार्थी मात्र ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळेच मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहिता यावीत, म्हणून ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ असा सल्ला ‘लोकमत’च्या माध्यमातून डॉ. नागेश अंकुश यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी याकडे देतात. या सगळ्यामध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते आणि ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षराचा आकार मात्र नंतर प्रत्येक पानागणिक अधिकच बेढब होत जातो. याविषयी सांगताना डॉ. नागेश म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासताना विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य अपुरे पडत आहे, याची जाणीव शिक्षकांना नेहमीच होते. काही मोजक्या उत्तरपत्रिका सोडल्या तर उर्वरित उत्तरपत्रिकांमध्ये लिखाणातील सुसूत्रता, वळणदार अक्षर, सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘उत्तरपत्रिका लिहावी नेटकी’ हा उपक्रम राबविण्यात आला आणि याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
उत्तरपत्रिका लिखाणाचे काही नियम, विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज
- अक्षर चांगले असेल तर लेखनाला अधिक गुण मिळू शकतात. त्याउलट खराब अक्षरामुळे ‘देय’ असलेले गुणही आपल्या पदरी पडणार नाहीत.
- उत्तरातील नेमकेपणा, आटोपशीरता महत्त्वाची असून परीक्षेतील सलग तीन तास लेखनाचा वेग कायम ठेवावा.
- परीक्षेसाठी वापरण्यात येणाºया पेनाचा हाताला सराव झालेला असावा. अगदी नवा कोरा पेन नेणे टाळावे.
- उत्तरे लिहिताना मजकुरातील महत्त्वाचा भाग अधोरेखित करावा. अधोरेखा आवश्यक तितकीच असावी. ती बटबटीत दिसू नये याची काळजी घ्यावी.
- सारांश लेखन करताना परिच्छेदातील मध्यवर्ती कल्पना, विचार, मुख्य आशय लक्षात घ्यावा. आशयसूत्र बदलू नये, याची काळजी घ्यावी.
- प्रत्येक ओळीत बसणारी शब्दसंख्या प्रमाणबद्ध असावी. खूप दूर किंवा खूप जवळ अक्षरे काढणे टाळावे.
- घाईघाईत लिहिताना अनावधानाने वाक्य सदोष होते. त्यामुळे जे लिहीत आहात, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. खाडाखोड टाळावी.
- विरामचिन्हांचा वापर उत्तरपत्रिकेत अचूक असावा.
- उत्तरलेखनात कृत्रिम वा पुस्तकी भाषा टाळून स्वत:च्या भाषेतील उत्तरेच प्रभावीपणे मांडावीत.
- परिच्छेदाची सुरुवात पानाच्या डावीकडे साधारण १ सेंटीमीटर अंतर ठेवून केलेली असावी आणि एका परिच्छेदात शक्यतो एकाच विवेचनाचा मुद्दा लिहिलेला असावा.
- शक्यतो क्रमवार उत्तरे लिहावीत, प्रश्न काळजीपूर्वक वाचावे, लिहिलेला बैठक क्रमांक तपासून घ्यावा.
उत्कृष्ट उत्तरपत्रिकेचे तीन पैलू
- अक्षर- समान उंची, योग्य अंतर, शिरोरेषा, डावीकडे- उजवीकडे न झुकू देता उभे सरळ काढलेले अक्षर.
- लेखनपद्धती- अभ्यासपूर्ण, संदर्भसंपन्न, अचूकता, स्वत:ची भाषा, व्यवस्थितपणा, आखीव- रेखीव, शुद्धता, आकर्षक, विरामचिन्हांचा अचूक वापर.
- उत्तरलेखन- प्रस्तावना, मुद्देसूदपणा, वेधक, समास, नेमकेपणा, उपसमास व क्रमांक़
लेखन कौशल्य आवश्यक
भाषण, संभाषण, श्रवण आणि लेखन हे चार मुद्दे भाषा कौशल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केला आहे, तो योग्य पद्धतीने त्यांच्या उत्तरातून समोर येणे गरजेचे असते. याशिवाय स्पर्धा परीक्षा सोडल्यास उर्वरित सर्व परीक्षा या लेखी स्वरूपाच्याच असतात. त्यामुळे फक्त बोर्डाच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर उच्चशिक्षण घेणारे, राज्यसेवा, लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांनीही उत्तरपत्रिका लिहिताना काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. नागेश अंकुश