ओबीसींना ‘सारथी’ लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:01 AM2018-05-07T00:01:24+5:302018-05-07T00:05:12+5:30
मराठा व कुणबी समाजासाठी लागू करण्यात येत असलेली सारथी योजना आधी ओबीसींना लागू करा, अशी आग्रही मागणी आज येथे आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा व कुणबी समाजासाठी लागू करण्यात येत असलेली सारथी योजना आधी ओबीसींना लागू करा, अशी आग्रही मागणी आज येथे आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली. ते जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ओबीसी जनगणना परिषदेचे उद्घाटन करताना बोलत होते.
महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, स्वागताध्यक्ष प्रल्हाद राठोड, परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, ईश्वर बाळबुधे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, शांताराम गाडेकर, माजी महापौर बापू घडमोडे, विलास काळे, माया गोरे, सुनीता काळे, नगरसेविका कीर्ती शिंदे, मनोज घोडके, डॉ. पी. बी. कुंभार, विवेकानंद सुतार, भास्कर सरोदे, अरुण सरोदे, रविराज बडे, माजी आमदार भाऊ थोरात आदींची विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
आ. राठोड म्हणाले ओबीसींची परिस्थिती वाईट असतानाही शासन त्यांच्यासाठी काही करायला तयार नाही. मराठा- कुणबींसाठी जी सारथी योजना लागू होणार आहे, ती आधी ओबीसींसाठी लागू झाली पाहिजे.
या परिषदेत विविध ठराव संमत करण्यात आले. ते असे : ओबीसींची जातीनिहाय जनगणना जाहीर करा, फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक आरक्षण द्या, लोकसभा व विधानसभांसाठी ओबीसींचे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करा, ओबीसी समाजासही अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, शिक्षणाचे राष्टÑीयीकरण करा, शंकरराव लिंगे व सुषमा अंधारे यांच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या, भटके, विमुक्त, अल्पसंख्याकांना सुरक्षा तथा नागरी हक्क प्रदान करा, मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करा, मुस्लिम समाजासाठी रंगनाथन व सच्चर आयोगाच्या सर्व शिफारशी त्वरित लागू करा, खाजगी क्षेत्राचे एससी, एसटी व ओबीसींसाठी आरक्षण लागू करा.
समता जलकुंभ
गेल्या ११ एप्रिलपासून आ. हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही संविधानिक यात्रा सुरू आहे. भिडेवाड्यापासून या यात्रेचा प्रारंभ झाला. भिडेवाड्यातील पाणी असलेला समता जलकुंभ हे या यात्रेचे एक वेगळे वैशिष्ट्य होय. आजही हा जलकुंभ विचारपीठावर ठेवण्यात आला होता.