छत्रपती संभाजीनगर : प्रवाशी भरण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोन दिवसांनी एका रिक्षाचालकाने इतर चार ते पाच मित्रांना सोबत घेऊन येत दुसऱ्या चालकास शिवीगाळ करीत चाकूने भोसकले. हा प्रकार २ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात ४ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
अज्जु उर्फ बंबय्या (रा. मिसारवाडी) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. गंभीर जखमी चालक शेख आसेब शेख मुसा (रा. बिस्मिल्ला कॉलनी,नारेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मोठ्या भावाच्या नावावर असलेली रिक्षा (एमएच २० बीटी ९३४२) चालवतात. ३० एप्रिल रोजी सिडको बसस्थानक परिसरात रिक्षात प्रवासी भरण्यावरून आरोपी अज्जु याच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आसेब हा सिडको बसस्थानक परिसरात रिक्षात प्रवासी भरत असतानाच त्याठिकाणी अज्जु हा चार ते पाच लोकांना घेऊन आला. त्याने 'तु ज्यादा मस्ती मे आया क्या? तुझे मै सिडको बस स्टँड से रिक्षा चलाने नाही दुंगा' अशी धमकीच दिली. त्यानंतर चाकूने आसेबच्या पोटावर, कपाळावर वार केले. यात आसेब हा जमिनीवर कोसळला. बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी निघुन गेले. त्यानंतर उपस्थित इतर रिक्षाचालकांनी जखमी आसेबला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्याने एमआयडीसी सिडको ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी अज्जुच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.