लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना-भाजपमधील सुंदोपसुंदी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. सोमवारी महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहातही सेनेने भाजपवर राजकीय ‘बाण’ सोडला. हा बाण भाजपच्या एवढा जिव्हारी लागला की, सेनेला प्रत्युत्तरही देण्यासाठी भाजपकडे शब्द नव्हते.त्याचे झाले असे की, सोमवारी सकाळी ११.३० वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच भाजपने गुजरात, हिमाचल प्रदेशात मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी राहुल गांधी अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडला. गोंधळात जगताप यांच्या ठरावाकडे क्षणभर दुर्लक्ष झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अफसर खान यांनी निवडणूक निकाल पूर्णपणे येऊ तरी द्या, असा सल्ला भाजपच्या सदस्यांना दिला. त्याकडेही भाजप नगरसेवकांनी दुर्लक्ष करून पंतप्रधान, पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांचे अभिनंदन करा, असा आग्रह धरला. माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी फुलंब्री नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करावे असे नमूद केले. भाजपचा हा गवगवा (पान २ वर)हे नवीन नाही...महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेकडे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यापाठोपाठ भाजपकडे आहेत. मनपाच्या सत्तेत सेना-भाजप युतीमध्ये आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची कोणतीच संधी सोडलेली नाही. सोमवारीही भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेने ‘ऐनवेळी’परिपूर्ण खेळी केली, हे विशेष.खैरे यांची भविष्यवाणी...मागील आठवड्यातच खा. चंद्रकांत खैरे यांनी फुलंब्री नगराध्यक्ष निवडणुकीत येणाºया काही दिवसात राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत दिले होते.औरंगाबाद महापालिकेत सध्या सेनेचे आणि खैरे यांचे अत्यंत विश्वासू महापौर आहेत. सोमवारी महापालिकेच्या राजकीयपटलावर सेनेने चक्क राहुल गांधी यांच्या अभिनंदन ठरावाला अनुमोदन देऊन खैरे यांची भविष्यवाणी खरी ठरविली.
सेनेचा भाजपवर ‘बाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:13 AM