- बापू सोळुंके ।
औरंगाबाद : बदल्यांचे आदेश होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला तरी बदली झालेले निम्म्याहून अधिक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही पूर्वपदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात ३१ मे रोजी विद्यमान पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या ठाण्यात १ जूनला रुजू होऊन तसा अहवाल पोलीस आयुक्तालयास सादर करण्याचे नमूद आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यात दोनपेक्षा अधिक वर्ष सेवा झालेल्या ३९ पोलीस उपनिरीक्षक आणि ९ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केल्या. याबाबतचे आदेश ३१ मे रोजी पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. या आदेशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त होऊन बदली झालेल्या ठाण्यात १ जून रोजी रुजू व्हावे आणि तसा अहवाल लगेच आयुक्त कार्यालयास सादर करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. रविवारी या आदेशाला १७ दिवस पूर्ण झाले. परंतु पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही नव्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. काही ठाणेदारांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, जोपर्यंत नवीन अधिकारी आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत आमच्या ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडणार नाही.
आता होईल अंमलबजावणीशहरात मागील महिन्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ईद आल्यामुळे प्रत्येक ठाण्यांतर्गत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक यांना भौगोलिक आणि समाजकंटकांची माहिती असते. ही बाब लक्षात घेऊन ईद होईपर्यंत बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना लगेच कार्यमुक्त करू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. ईद शांततेत पार पडल्याने आता या बदल्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल.- डॉ. दीपाली धाटे - घाडगे