सहायक पोलीस निरीक्षकाला ८० हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:19 AM2019-11-15T11:19:28+5:302019-11-15T11:22:53+5:30
वाळूजमध्ये भंगार व्यावसायिकाला मागितले होते २ लाख
औरंगाबाद : विभागीय आयुक्तालयातील लिपिकाने ४० हजार रुपयांची लाच घेण्याचे प्रकरण होऊन एक दिवस होत नाही तोवरच गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यास लाचलुचपत विभागाने एका भंगार व्यावसायिकाकडून ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक रोडे हा वाळूज एम. आय. डी. सी. ठाण्यातील डी. बी. पथक प्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याला दोन महिन्यांपूर्वीच उपनिरीक्षक पदावरून बढती मिळाली होती. भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे रोडे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. भंगार खरेदी माहितीचे रेकॉर्ड ठेवणे आणि चोरीचे भंगार खरेदी केल्यानंतर कारवाई न करण्यासाठी पथकप्रमुख म्हणून रोडेने दोन लाख रुपये मागितले होते. त्यातील ८० हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाने रोडेला पकडले. भंगार व्यावसायिकाची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधिक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनखाली अन्य अधिकाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज ठाणे परिसरात सापळा रचला. तेव्हा सहायक पोलीस रोडेने तक्रारदार व्यावसायिकाकडून ८० हजार रुपये लाच घेताच पथकाने त्यास पकडले. रोडेसोबत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीनी ताब्यात घेतले आहे त्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती उपअधीक्षक गावडे यांनी दिली . त्या चौघांचा गुन्ह्यात सहभाग आहे, अथवा नाही, याची खात्री झाली की त्यांची नावे सांगू असे गावडे म्हणाले.
वाळूज मध्ये भंगार खरेदी-विक्रीची अनेक दुकाने
ही कारवाई पोलिस निरिक्षक गणेश धोकरट यांनी गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास केली. कंपन्यांमधील भंगार खरेदी विक्रीच्या एमआयडीसी वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. एका कंपनीतील भंगार खरेदीवरून दुकानदारावर कारवाई न करण्यासाठी राहुल रोडे व डीबीच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली होती. ८० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र भंगार दुरानदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. पोलिस व निरीक्षक धोकरट व त्यांच्या पथकानेने सापळा रचून ८० हजार रुपये रोख घेताना राहुल रोडे याला अटक केली. या प्रकारानंतर पोलिस खात्यात खळबळ उडाली.