औरंगाबाद: डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून व्यायाम करून घरी परतत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरटिणीस संजय फकिरचंद फतेलष्कर (४७,रा.बेगमपुरा)यांच्यावर मिरची पावडर फेकुन चार जणांनी तलवारीने हल्ला केला. विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागासमोर रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या फतेलष्कर यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देताना बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, फतेलष्कर हे नेहमीप्रमाणे आज सायंकाळी चारच्या सुमारास पायी गोगाबाबा टेकडीकडे फिरायला आणि व्यायामासाठी गेले होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते घरी परतत असताना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागासमोर कारमधुन आलेल्या चार ते पाच जणांनी जुन्या वादातून त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून फतेलष्कर हे बाजुला झाल्याने बचावले. मात्र ते खाली पडल्याचे पाहुन हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने मिरची पावडर फेकली. ही पावडरही त्यांनी चुकविली तेवढ्यात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यातील काही वार फतेलष्कर यांनी हातावर झेलले. तर एक वार खांद्याला लागल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. यावेळी त्यांनी आरडा-ओरड केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
तरुण धावला मदतीला
जखमी फतेलष्कर यांना पाहून एका तरुणाने त्यांना लगेच त्याच्या मोटारसायकलवरून घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताचबेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागातील त्यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. रात्री उशीरा त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी फतेलष्कर यांच्या तक्रारीवरुन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरु होती.