औरंगाबादेत एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:57 PM2018-04-05T18:57:52+5:302018-04-05T19:36:29+5:30
बुधवारी रात्री शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले.
औरंगाबाद : एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लुटण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रकारचे प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे ऐकण्यात आलेले आहे. बुधवारी रात्री शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क पिस्टलातून फायरिंग केल्याचे समोर आले. एवढे करूनही एटीएम मशीन न फुटल्याने त्यातील ३ लाख २० हजाराची रोकड सुरक्षित राहिली.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, सेवन हिल ते गजानन महाराज मंदीर रोडवरील निलेश अॅटोमोबॉईल या दुकानाशेजारी एस.बी.आय. चे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक नसतो, ही बाब लक्षात घेऊन बुधवारी रात्री ३.१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीनचा पत्रा उचकटल्यानंतरही रोकड निघत नसल्याने आरोपींनी मशीनवर चक्क पिस्टलमधून दोन गोळ्या फायर केल्या. या फायरिंग नंतरही मशीनमधील पैशाचा ट्रे त्यांच्या हाती लागला नाही. यामुळे रिकाम्या हाताने चोरटे तेथून पसार झाले.
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास बँकेचे अधिकारी कर्मचारी एटीएम मशीनमध्ये नोटा जमा करण्यासाठी गेले असता त्यांना ही एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना या बाबत माहिती दिली. पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल.ए.सिनगारे, गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे,सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.