- विजय सरवदेछत्रपती संभाजीनगर : शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेलेले विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही. अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी १६ मार्चपर्यंत अर्जाची मुदत वाढविण्यात आली आहे.
काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना?अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असतानादेखील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना राहाण्याची, भोजनाची व्यवस्था उपलब्ध व्हावी. तसेच, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यातस्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी क्षेत्रानुसार अनुदान दिले जाते. शिष्यवृत्तीची ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
कोणाला मिळते शिष्यवृत्ती?महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नवबौद्ध घटकातील अकरावी, बारावी, व्यावसायिक किंवा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, जे शासकीय वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती दिली जाते.
कागदपत्रे काय लागतात?या योजनेसाठी विद्यार्थ्यास दहावी पास प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत), शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, विद्यार्थीचे ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आहे त्या खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रत, दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर संबंधित महाविद्यालयाकडून बोनाफाइड, महाविद्यालय उपस्थिती प्रमाणपत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याचे शपथपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
कोठे कराल अर्ज?या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा अर्ज भरून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात जमा करायचा आहे.
१६ मार्चपर्यंतची मुदतसन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १६ मार्चपर्यंत आहे.
अर्ज अचूक भरावा या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी १६ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज अचूक भरून आवश्यक कागदपत्रांसह तो समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावा.- पी. बी. वाबळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग