छत्रपती संभाजीनगर: अत्यंत चुरशीच्या झालेल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मंत्री अतुल सावे यांनी अखेरच्या फेरीत केवळ १ हजार ७७७ मतांनी निसटता विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून ते २० व्या फेरीपर्यंत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर सावे यांनी आघाडी तोडत विजयश्री खेचून आणला.
२०१९ मध्ये या मतदारसंघात ६३.२ टक्के मतदान झाले होते. २०२४ साली ते ६०.६३ टक्के झाले. अडीच टक्क्यांनी मतदान घटले याचा अर्थ एकूण मतदानाच्या तुलनेत सुमारे ११ हजार मतदान कमी झाले आहे होते. लाडकी बहीण योजना आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा उत्साह अधिक असेल असे वाटत असताना मतदान कमी झाल्याने उमेदवारांत चिंता होती. सुरूवातीच्या फेरीत जलील यांनी मोठी आघाडी घेतल्याने सावे यांची धाकधूक वाढली होती. सावे यांनी २१ व्या फेरीत ३ हजार १७९ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर सावे यांनी लिड कमी होऊ दिली. अखेरच्या फेरीत सावे यांनी २ हजार ८०० मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणला. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा निसटता पराभव झाला.
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत झाली असली तरी एमआयएम आणि भाजपमध्येच खरा सामना झाला. एकूण ३ लाख ५४ हजार ६३३ मतदारांपैकी २ लाख १५ हजार २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १ लाख १४ हजार १०४ पुरुष तर १ लाख ९२१ महिला मतदारांनी मतदान केले. १ लाख ३९ हजार ६०४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.
भाजपचे अतुल सावेंच्या विजयाची कारणेया मतदारसंघातील मराठा समाजाचे मतदान कुणीकडे जाते, याविषयी मोठी चर्चा होती. मतदारसंघात सुमारे ३८ ते ४२ हजार मराठा मतदान आहे. यातील सुमारे २४ हजार मतदान झाल्याची चर्चा आहे. हे मतदान कुठे जाते, यावर भाजपची भिस्त होती. २० ते ४० वयाेगटातील मराठा मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात सूर होता. मात्र, त्यापुढील वयाच्या मतदारांचे मतदान मिळाल्याचा भाजपाचा दावा होता. मराठा समाजाचे मतदान काँग्रेस, एमआयएम, भाजप आणि नोटामध्ये विभागले गेल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. ठाकरे गटाने देखील एमआयएमला सहकार्य केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र, विभागलेल्या मतांची भर दलित व ओबीसी आणि काही अंशी मराठा मताने भरून निघल्याने सावे यांचा विजय साकार झाल्याचे राजकीय अभ्यासकांचे निरीक्षण आहे.