औरंगाबाद : जिल्ह्यात लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: हायटेक प्रक्रिया राबविण्यासाठी वेगाने तयारी करीत आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अॅप्स निवडणूक काळात वापरण्यावर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आयसीटी अॅप्लिकेशन्स निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहेत. व्होटर हेल्पलाईन, पीडब्ल्यूडी अॅप, सुविधा, सी-व्हिजिल, समाधान असे सहा अॅप्स निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या अॅपमध्ये मतदाराचे नाव, ओळखपत्र आदी माहिती सहजरीत्या उपलब्ध होणे शक्य होईल. पीडब्ल्यूडी अॅप दिव्यांग मतदारांसाठी विकसित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या अॅपद्वारे सुविधा मिळविता येणे शक्य होईल.
राजकीय पक्षांसाठी सुविधा अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या राजकीय पक्षांना मिळविणे सोपे होणार आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकांसाठी सिव्हिजिल अॅप आहे. या अॅपवरून आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तक्रार नागरिकांना करता येईल. हे अॅप थेट निवडणूक आयोगाशी जोडलेले असल्यामुळे तक्रार येताच, कारवाई करण्याच्या दिशेने तयारी सुरू होईल, असा दावा प्रशासन करीत आहे. सुविधा आणि समाधान या दोन्ही अॅपद्वारे तक्रार निवारणासाठी वापर केला जाईल, तर १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या गाऱ्हाणी ऐकून त्या सोडवणुकीसाठी देण्यात आला आहे.
तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी कक्षजिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी आणि माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक खर्च नियंत्रण कक्षदेखील त्याच मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. सोशल मीडिया, मुद्रित व दृक्श्राव्य माध्यमांवरील जाहिरातींवर खर्च नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून राहणार आहे. एक खिडकीतून विविध परवानग्या मिळणे सोपे होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जारी होणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.