औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. नव्या विमानसेवेच्या उड्डाणांची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे.
ग्राहक (प्रवासी) समाधान सर्वेक्षणात चिकलठाणा विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळविले आहे. स्वच्छता, पार्किंग, बॅग्ज डिलिव्हरी स्पीड, वॉशरूम सुविधा, ट्रॉली सुविधा, चेक ईन लाईन, सुरक्षा, विमानतळावरील कर्मचाऱ्यांची वागणूक, फ्लाईट इन्फॉर्मेशन स्क्रीन, सुरक्षा तपासणीत लागणारा वेळ, शिष्टाचार आणि निरीक्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्तणूक, इंटरनेट सुविधा, वायफाय, रेस्टॉरंट, एटीएम या बाबतीत विमानतळ परिपूर्ण असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
औरंगाबाद विमानतळावरून आजघडीला हैदराबाद-तिरुपती, मुंबई आणि दिल्ली या तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. एअर इंडिया, ट्रूजेट आणि जेट एअरवेज या तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद आहे. ही विमानसेवा कधी सुरळीत होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. चिकलठाणा विमानतळ ग्राहक समाधान सर्वेक्षणात पहिल्या दहा विमानतळांमध्ये आल्याने शहरासाठी ही चमकदार कामगिरी ठरत आहे; परंतु त्याच वेळी येथील विमानसेवेचा विस्तार होण्याची गरज प्रकर्षाने व्यक्त होत आहे.
औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरूआहे. शहरातील उद्योजकांकडूनही पाठपुरावा केला जात आहे; परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी नवीन विमानसेवेचे ‘टेकआॅफ ’ होत नसल्याची चिंता व्यक्त होत आहे.
एकत्रित प्रयत्नांची गरजग्राहक (प्रवासी) समाधान सर्वेक्षणात विमानतळ दहाव्या स्थानी आहे; परंतु याबरोबर येथून नवीन विमाने सुरूझाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीकडून प्रयत्न होत आहे; परंतु सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवाय त्यास राजकीय पाठबळ मिळणे आवश्यक आहे, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.
या कंपन्यांनी दर्शविली होती रुचीइंडिगो एअरलाईन्स, डेक्कन एव्हिएशनसह झूम एअर या कंपनीने औरंगाबादहून विमान सुरू करण्यास रुची दर्शविली होती. औरंगाबाद-दिल्लीसाठी विमानसेवा झूम एअर या विमान कंपनीने पुढाकार घेतला. प्रस्तावही डीजीसीएकडे सादर केला. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर औरंगाबाद-दिल्ली मार्गाची नोंद करून विमानसेवा सुरू होणार असल्याचे संकेतही दिले होते; परंतु प्रत्यक्षात या विमान कंपन्यांची प्रतीक्षाच आहे.