नांदेडविरुद्ध औरंगाबादचा निर्णायक विजय हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:09 AM2017-12-24T00:09:34+5:302017-12-24T00:13:55+5:30
मॅण्डेटरीच्या अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज असतानाही या षटकात फक्त दोन धावा काढता आल्याने औरंगाबादचा संघ एडीसीएवर शनिवारी झालेल्या एमसीएच्या १६ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत नांदेडविरुद्ध निर्णायक विजयापासून थोडक्यात वंचित राहिला.
औरंगाबाद : मॅण्डेटरीच्या अखेरच्या षटकात विजयासाठी सहा धावांची गरज असतानाही या षटकात फक्त दोन धावा काढता आल्याने औरंगाबादचा संघ एडीसीएवर शनिवारी झालेल्या एमसीएच्या १६ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत नांदेडविरुद्ध निर्णायक विजयापासून थोडक्यात वंचित राहिला.
नांदेड संघाने चहापानाआधीच दुसरा डाव ५ बाद १११ या धावसंख्येवर घोषित करताना औरंगाबादला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेत्रदीपक पूल आणि सुरेख ड्राईव्ह मारणाºया सलामीवीर संकेत पाटील आणि सागर पवार यांनी औरंगाबादला जबरदस्त सुरुवात करून देताना १५ षटकांत ८० धावांची सलामी दिली. या सलामीमुळे औरंगाबादच्या निर्णायक विजयाच्या आशा उंचावल्या; परंतु प्रारंभी सागर पवार आणि नंतर निर्णायक क्षणी जम बसलेला संकेत पाटील धावबाद झाल्याने सामन्याला कलाटणी मिळाली.
आशुतोष पराये याने झुंजार फलंदाजी केली; परंतु तो औरंगाबादला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि औरंगाबादला ३८ षटकांत ९ बाद १६९ पर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात आघाडी घेणाºया नांदेड संघाला या सामन्यात ३ गुण मिळाले, तर निर्णायक विजयाची संधी हुकवलेल्या औरंगाबादला एका गुणावर समाधान मानावे लागले. औरंगाबादकडून संकेत पाटील याने ७८ चेंडूंत सर्वाधिक ६२ धावा केल्या. सागर पवारने २६, अंश ठोकळने १५ व आशुतोष पराये याने नाबाद १४ धावा केल्या. नांदेडकडून अकीब मिर्झा याने ४९ धावांत ४ गडी बाद केले.
तत्पूर्वी, ३ बाद ३२ वरून खेळणारा औरंगाबादचा पहिला डाव नांदेडने १२९ धावांत गुंडाळताना ६१ धावांची आघाडी घेतली. औरंगाबादकडून दुसºया डावात संकेत पाटीलने १७, तनुज साळुंकेने नाबाद १५ व अंश ठोकळने १६ धावा केल्या. नांदेडकडून अकीब मिर्झाने ४० धावांत ५, हर्षमितसिंग कापसे याने २९ धावांत ३ गडीबाद केले.
पहिल्या डावात आघाडी घेणाºया नांदेडने त्यांचा दुसरा डाव ५ बाद १११ या धावसंख्येवर घोषित केला. त्यांच्याकडून गौरव अलमखांबे याने ६८ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ व रौनित फुलारी याने १८ धावांचे योगदान दिले. औरंगाबादकडून अंश ठोकळने १५ धावांत ३ गडी बाद केले. तनुज साळुंकेने १ गडी बाद केला.