औरंगाबाद : ‘समांतर’च्या बैठकीवर भाजपने फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:22 AM2018-04-10T00:22:47+5:302018-04-10T10:34:03+5:30
समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले.
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणा-या कंपनीसोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर सोमवारी महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी युटिलिटी कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक आयोजित केली. मात्र हीबैठक महापालिकेत ही बैठक सुरु होण्याच्या एक तास आधी तिकडे सिडकोमध्ये भाजप नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाणीटंचाईचे निमित्त करुन पाण्याच्या टाकीवर जोरदार आंदोलन केले. त्यामुळे महापालिकेतील ‘समांतर’ची बैठक सोडून महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवल किशोर राम तसेच पदाधिकारी व अधिकाºयांना एन- ५ कडे धाव घ्यावी लागली.
पाणीटंचाईचा मुद्दा पुढे करत भाजप, काँग्रेस आणि इतर नगरसेवकांनी सिडको-हडको आणि जालना रोडच्या पलीकडील अनेक वॉर्डांना पाणीच येत नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड, बापू घडामोडे, माधुरी अदवंत , काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, सोहेल शेख आदींसह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महपौर घोडेले आणि नवल किशोर राम यांनी तातडीने महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजित करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर महापालिकेत नगरसेवकांसमवेत पदाधिकारी व अधिकारी अशी बैठक झाली. मात्र बैठकीत कोणताही पाणीप्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपने ‘समांतर’च्या बैठकीवर आंदोलनाच्या माध्यमाने पाणी फेरल्याची चर्चा महापालिकेत होती.
जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणी आणण्याचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटीला परत देता येऊ शकते का, याची चाचपणी राज्य शासन, मनपाकडून सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी एक बैठकही घेण्यात आली. या बैठकीस भाजप, सेना, एमआयएम आमदार उपस्थित होते. यानंतर कंपनीच्या अधिकाºयांनी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही भेट घेतली. त्यांनी सोमवार ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मनपात कंपनीच्या अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘समांतर जलवाहिनीवरून जोरदार राजकारण सुरू असून त्याचा प्रत्यय सोमवारीही आला.
चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
स्थायी समितीच्या सभागृहात आंदोलक नगरसेवकांसमवेत दुपारी १ वाजता बैठकीला सुरुवात झाली. यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचे दु:ख मांडत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. महापौर घोडेले यांनी त्यांना विचारणा केली की, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ म्हणून तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत. यावर चहल यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. शेवटी प्रभारी आयुक्तांनी नमूद केले की, आज सायंकाळी ६ वाजता मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
‘सर्व वॉर्डांत तीन दिवसांआड पाणी द्या’
शहरातील अनेक वॉर्डांना पाच आणि सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सोमवारी सकाळी झाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश दिले. उद्या, मंगळवारपासूनच याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशही त्यांनी दिले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी त्वरित अंमलबजावणीस होकारही दर्शविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सर्व पाणीपुरवठ्याचे अधिकारी एकत्र बसून नियोजन करणार आहेत. शहरातील ५० वॉर्डांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उर्वरित वॉर्डांना तीन, चार आणि पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. नियोजन करून उन्हाळ्यात तीन दिवसांआड पाणी देण्यात येणार आहे.