- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांत गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांनी पाच वर्षांपर्यंतच्या तब्बल ९१५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील २२० बालकांचा समावेश आहे.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीबरोबर महापालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्रे आहेत. खाजगी रुग्णालयांचा विस्तार झालेला आहे. चिकलठाणा येथे नव्याने जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील आता कार्यरत झाले आहे, तर ग्रामीण भागातही आरोग्य विभागाच्या रुग्णालयाचे आणि आरोग्य केंद्रांचे जाळे आहे. या सर्व रुग्णालयांच्या माध्यमातून बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतो; परंतु गेल्या आठ महिन्यांत बालमृत्यूची संख्या मनाला चटका लावून जाणारी आहे.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबादसह जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ३८२ बालमृत्यू झाले आहेत. पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक लागतो. औरंगाबादेत २२० बालके दगावली असून, यात शहरातील ३४ बालकांचा समावेश आहे. जालना आणि हिंगोलीत अनुक्रमे १६३ आणि १५० बालके मृत्युमुखी पडली. एक ते पाच वर्षे वयोगटातील या बालकांनी जन्मानंतर अवघ्या काही कालावधीत जगाचा निरोप घेतला.
आरोग्य विभागातर्फे बालकांच्या मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर केला जातो. या बालकांच्या मृत्यूला अनेक कारणे असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या कारणांमुळे बालकांचा मृत्यू होऊ नये, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.
प्रमाण कमी झालेबालमृत्यूचे प्रमाण हे चार जिल्ह्यांतील लोकसंख्येचा विचार करता निश्चित कमी असल्याचे दिसते. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालये, लसीकरण, बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता अशा आरोग्य सुविधांमुळे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
चार जिल्ह्यांतील परिस्थिती : जिल्हा बालकांचा मृत्यू औरंगाबाद २२० जालना १६३ हिंगोली १५० परभणी ३८२ एकूण ९१५
ही आहेत मृत्यूची कारणे : न्यूमोनियाकमी वजनमुदतपूर्व प्रसूतीडायरियाजंतुसंसर्गश्वसनाशी संबंधित आजारअपघातविषबाधाअचानक मृत्यू व इतर