औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टँकरच्या ६१९ खेपांनी ग्रामीण भागाला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 06:15 PM2018-11-19T18:15:03+5:302018-11-19T18:19:36+5:30
पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती हळूहळू गंभीर वळणावर जात आहे. ६१९ टँकरच्या खेपा ग्रामीण भागातील तहानलेल्या गावांसाठी सध्या सुरू असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांची परिस्थिती गंभीर वळणावर असून, पुढील काही महिन्यांत भीषण पाणीटंचाईचा सामना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला करावा लागणार आहे. ८ वाड्यांसह २४३ गावांतील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना दुसरा पर्याय सध्या नाही.
३०० च्या आसपास टँकरचा आकडा पोहोचला असून, २९८ खाजगी टँकरमार्फत हा पाणीपुरवठा सुरू आहे. १३४ विहिरींचे अधिग्रहण केल्याचे विभागीय प्रशासनाने म्हटले आहे. पैठणमधील ५० गावे, गंगापूरमधील ८२ गावे आणि वैजापूर, सिल्लोडमधील अनुक्रमे ४०, ३३ गावे टँकरच्या पाण्यावर अवंलबून आहेत. हिवाळ्यामध्ये ३०० टँकरने पाणीपुरवठा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१२ च्या तुलनेत यंदा पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट असेल त्याचे हे द्योतक आहे.
४१३ खेपा तीन तालुक्यांत
पैठण तालुक्यात ११६ खेपा, गंगापूरमध्ये १८०, तर वैजापूर तालुक्यात ११७ खेपांनी टँकरचे पाणी ग्रामीण भागातील नागरिकांना पुरविले जात आहे. या तिन्ही तालुक्यांत ४१३ खेपा होत आहेत. १३४ विहिरींचे अधिग्रहण पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने केले आहे. त्यातील ११४ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
तालुका लोकसंख्या टँकर
औरंगाबाद ५१ हजार ५४६ २९
फु लंब्री २१ हजार ५५० १०
पैठण १ लाख १२ हजार ५६
गंगापूर १ लाख ५८ हजार ९१
वैजापूर ७४ हजार ३९४ ५७
खुलताबाद ४ हजार ५०० ०१
कन्नड १७ हजार २९३ ०८
सिल्लोड १ लाख २६ हजार ४७
सोयगाव ०० ००
एकूण ५ लाख ६५ हजार २९९