औरंगाबाद - दुबई विमानसेवेची हालचाल; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:03 PM2018-06-15T12:03:44+5:302018-06-15T12:06:05+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आगामी काही दिवसांत औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच ही विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
फ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांना प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये औरंगाबादसह नागपूर आणि पुण्यासाठी थेट दुबईसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोन बाबींमुळे ही विमानसेवा सुरू करण्यासाठी वावदेखील आहे. ही शहरे दुबई आणि भारत यांच्यातील विमानसेवा कराराबाहेरील आहेत; परंतु विशेष बाब म्हणून या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.या विमानसेवांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. पर्यटन आणि उद्योग वाढीला हातभार लागेल. दुबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे प्रस्तावात नमूद आहे.
औरंगाबाद ते दुबई ही विमानसेवा दररोज चालविण्याची तयारी फ्लाय दुबई कंपनीने दर्शविली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १ जुलैपासून ही सेवा सुरू करण्याचा मानसही कंपनीने व्यक्त केला. यासंदर्भात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत; परंतु फ्लाय दुबईसंदर्भात अधिकृत माहिती प्राप्त नसल्याने काही सांगता येणार नाही.
असे आहे विमान
या सेवेसाठी फ्लाय दुबई कंपनीकडून बोर्इंग ७३७-८०० हे विमान प्रवाशांसाठी वापरण्यात येणार आहे. त्याची १७४ प्रवासी व २ हजार ५०० किलो कार्गो वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे औरंगाबादेतील माल थेट दुबईत पाठविण्याची सोय होईल. त्यातून उद्योगवाढीलाही हातभार लागेल. दुबई येथून सकाळी ८.३० वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी १२.५० वाजता विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.४० वाजता दुबईसाठी उड्डाणाचे नियोजन करण्यात आले आहे.