औरंगाबाद : एसटी महामंडळाने खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी मोठा गाजावाजा करून वातानुकूलित शिवशाही बस रस्त्यावर उतरविल्या. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून ‘एसटी’च्या ताफ्यात ३९ शिवशाही बस आहेत. त्यातील केवळ दोनच बस मुंबईसाठी धावतात. खासगी ट्रॅव्हल्सच्या तब्बल ३० बस दररोज मुंबईला भरून जात असताना एसटी महामंडळाचे अधिकारी या मार्गावर प्रवासी नसल्याचे तुणतुणे वाजवीत आहेत. परिणामी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी बसचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.
एसटी महामंडळ काळानुरूप बदल करीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपाययोजना करीत आहे. औरंगाबादेत गेली अनेक वर्षे केवळ पुण्यासाठी ‘एसटी’ची आरामदायक अशी शिवनेरी बसची सेवा सुरू होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विभागाला आॅक्टोबर २०१७ मध्ये दोन शिवशाही बस देण्यात आल्या. यानंतर टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होत गेल्या. वातानुकूलित, एअर सस्पेंशन, एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधा आणि किफायतशीर तिकीटदरामुळे शिवशाही बस अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली. सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक मिळून शिवशाही बसची संख्या आता ३९ वर गेली आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. औरंगाबादहून मुंबईला जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. अनेकांना वेटिंगवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासी एसटी आणि खाजगी बसला प्राधान्य देतात. ‘एसटी’कडून मुंबईसाठी दोनच शिवशाही बस चालविण्यात येतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना खाजगी बसकडे वळावे लागत आहे. एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन मुंबईसाठी आणखी बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
बीड, नांदेडला शिवशाहीनाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, सावंतवाडी, लातूर, भुसावळ, अकोला, यवतमाळसह बीड, नांदेड मार्गावरही शिवशाही बस चालविण्यात येत आहे. सिडको बसस्थानकातून रात्री ११.३० वाजता मुंबईसाठी शिवशाही बस सुटते. या बसचे ६४९ रुपये प्रवासभाडे आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सायंकाळी ५.३० वाजता औरंगाबाद-बोरिवली या मार्गावर शिवशाही बस धावते. या दोन बसचा प्रवाशांना आधार मिळतो. इतर विभागातील काही बस धावतात; परंतु त्या बस आधीच प्रवाशांच्या गर्दीने भरून येतात.
खाजगी बस ‘सुसाट’च्रेल्वेतील गर्दी आणि ‘एसटी’च्या परिस्थितीने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी खाजगी बसचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत तिकीट दर देण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावते. एकट्या औरंगाबादेतून मुंबईतून दररोज ३० खाजगी बस धावतात. यातून दररोज किमान ९०० जण प्रवास करतात.
मागणी यावीमुंबई बससाठी फार मागणी नाही. प्रवाशांची मागणी आली तर लगेच शिवशाही बस सुरू केली जाईल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी म्हणाले.
वेगवेगळे दरशहरातून मुंबईसाठी ३० ट्रॅव्हल्स बस धावतात. वेगवेगळ्या बसचे वेगवगळे दर आहेत. ८०० पासून १२०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते, अशी माहिती औरंगाबाद बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली.
प्रवासी म्हणतात...मुंबईला नियमितपणे ये-जा करावी लागते. मुंबई मार्गावर शिवशाही बस वाढवल्या जातील, अशी अपेक्षा होती; परंतु तसे होताना दिसत नाही. जी बस आहे, त्यामध्ये जागा मिळण्याची शाश्वती नसते. त्यामुळे खाजगी बसचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मुंबईसाठी शिवशाही बसची संख्या वाढली तर खाजगी बसकडे जाण्याचे टाळता येईल, असे एका प्रवाशाने सांगितले.