औरंगाबाद : वाहनाच्या हस्तांतरणाच्या(ट्रांसफर) प्रक्रियेसाठी ८० वर्षीय कॅन्सरग्रस्त वृद्धाला आरटीओ (RTO) कार्यालयात बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी औरंगाबाद शहरात घडला. यावेळी ऑक्सिजन नळीसह आरटीओ कार्यालयात आलेल्या या ज्येष्ठाला पाहून तिथे उपस्थित अनेकांनी संताप व्यक्त केला.
या कॅन्सरग्रस्ताला अन्न आणि पाणी हे नळीच्या माध्यमातूनच दिले जात आहे. असे असताना वाहनाच्या हस्तांतरणासाठी असलेल्या ‘बी फोर मी’ या प्रक्रियेसाठी त्यांना आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आले. आरटीओत दाखल झाल्यानंतरही आरटीओ कार्यालयातील खिडकीसमोर या ज्येष्ठाला तासभर ताटकळत ठेवण्यात आल्याचे अरुण माडूकर यांनी सांगितले.
याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार म्हणाले, आरटीओ कार्यालयाने संबंधिताला बोलावलेले नव्हते. जो व्यक्ती कॅन्सरग्रस्ताला आरटीओत घेऊन आला, तोच त्याला जबाबदार आहे. त्याविषयी आरटीओ कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नव्हती. वाहन विक्रीत गैरप्रकार होण्याची शक्यता असते. बोगस सह्या करून वाहने विकण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘बी फोर मी’ ही प्रक्रिया राबविली जाते. जर कोणाची अडचण असेल त्यासंदर्भात योग्य ती मदत केली जाते.